🪔 दीपावलीपूर्वी ‘उमेद’चा उजळ प्रकाश — महिलांच्या स्टॉल्सना पहिल्याच दिवशी ३३ हजारांची विक्री 🪔

Date: 2025-10-17
news-banner
🪔 दीपावलीपूर्वी ‘उमेद’चा उजळ प्रकाश — महिलांच्या स्टॉल्सना पहिल्याच दिवशी ३३ हजारांची विक्री 🪔

पालघर, १६ ऑक्टोबर (प्रतिनिधी) –
दीपावलीच्या उत्सवी वातावरणात पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘उमेद’ अभियानातील महिलांनी आपल्या कष्टाचे सोने केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत उभारलेल्या फराळ, दिवे, उटणे व सजावटीच्या वस्तूंच्या स्टॉल्सना पहिल्याच दिवशी तब्बल ३३,००० रुपयांची विक्री झाली आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी स्टॉल्सना भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेचे कौतुक करत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महिलांकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

डॉ. सातपुते म्हणाल्या, “या स्टॉल्समधून महिलांनी केवळ वस्तूंची विक्री नाही, तर त्यांच्या मेहनतीची आणि कल्पकतेची झलक दाखवली आहे. अशा उपक्रमांना समाजानेही पाठबळ द्यावे.”

हा विक्री उपक्रम , १७ ऑक्टोबर रोजीही जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू राहणार असून नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन ‘उमेद’च्या महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.

🌸 या उपक्रमातून ‘उमेद’च्या महिलांनी आत्मनिर्भरतेचा दीप उजळवून जिल्ह्यातील इतर स्वयंसहायता गटांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Leave Your Comments