पालघर | प्रतिनिधी —
नवापूर ग्रामपंचायतीतील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून ग्रामपंचायत अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे (वय ५२) यांना रु. २०,००० रकमेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्याकडे एका तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही सापळा कारवाई राबविण्यात आली. तक्रारदारास त्यांच्या जागेत तरंग तलाव व कृषी पर्यटनासाठी तीन खोल्या तसेच उपहार व न्याहरी सुविधा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत नवापूरकडून ना हरकत परवान्याची आवश्यक होती. यासाठी तक्रारदाराने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर केला होता.
तक्रारीनुसार, ना हरकत परवाना देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या राजेश संखे यांनी रु. २०,००० लाचेची मागणी केली. या मागणीची पडताळणी १६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याच दिवशी आयोजित सापळा कारवाईत पंचासमक्ष तक्रारदाराकडून रु. २०,००० स्वीकारताना संखेंना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाणे येथे स्टेशन डायरी नोंद क्रमांक ०९ (दि. १६/१२/२०२५, वेळ १६:४९) अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, आकाश लोहारे आणि जितेंद्र गवळे यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली. दादाराम करांडे, पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत असून वरिष्ठ स्तरावरून शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.