नवयुग पालघर
**राष्ट्र सेवा दलाचे व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न**
राष्ट्र सेवा दल पालघर जिल्ह्यातर्फे १३ ते १८ वयोगटातील मुलां-मुलींसाठी ०२ मे ते ०९ मे दरम्यान डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील सु.पे.ह. हायस्कुलच्या माजी विद्यार्थी संघाचे कम्पिंग ग्राउंड येथे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू, तलासरी, पालघर अणि वसई तालुक्यातून एकूण ६० शिबिरार्थी आणि १२ कार्यकर्ते या शिबिरात पूर्णवेळ सहभागी झाले होते.
शिबिरातील बौद्धिक सत्रात अंधश्रध्दा निर्मुलन - संजय भोईर, पथनाट्य प्रशिक्षण - जुराण लोपिस व मॅक्सवेल रोझ, वैज्ञानिक दृष्टीकोन -डॉ. नितीन हांडे, सर्पविज्ञान - सुर्यहास चौधरी, करिअर गाईडन्स - प्रदीप गुजराथी, पर्यावरण - सुजय मोरे, संविधान - मनिष देशपांडे, आर्थिक नियोजन - दीपक पाटील, बँकेतील गैरव्यवहार - नितीन गावकर, स्वभान ते समाजभान - प्रमोद निगुडकर यांनी खेळ व गटचर्चेच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. कल्पना दोडका यांनी वारली चित्रकला कार्यशाळा घेतली. तर लघुपट निर्माते दिग्दर्शक उमेश मालन यांनी त्यांचा दळण हा लघूपट दाखवून त्याचे विश्लेषण केले.
शिबिर कालावधीत शिबिरार्थ्यांना शिकविण्यात आलेल्या लेझिम, झांज, एरोबिक्स, गाणी आणि पथनाट्ये यांचे सादरीकरण डहाणू तालुक्यातील नरपड गावात करण्यात आले. सेवादल सैनिक शशिकांत पाटील यांनी शिबिरार्थ्यांना सेवा दलाची तसेच चळवळीची गाणी शिकवली. बौध्दीक विभागाची जबाबदारी संदीप चोपडेकर यांनी सांभाळली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख म्हणून उत्कर्ष राठोड व तेजस्विता मर्दे यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रज्ञा गावड, संघटक डेरिक रॉड्रीग्ज, संदीप ठाकूर, खजिनदार दयानंद वर्तक, विद्याधर ठाकूर, सुनिल महामुनी, प्रीतम मोरे, सेलरॉय दिब्रिटो, आरंभ डाबरे, प्राजक्ता मोरे, सुशांत राऊत आणि लायनल डाबरे आदींनी परिश्रम घेतले.