कोळगाव ग्राम सचिवालयाचे लोकार्पण

Date: 2026-05-17
news-banner
नवयुग पालघर :

**कोळगाव ग्राम सचिवालयाचे लोकार्पण**

             कोळगाव ग्रामपंचायतीच्या नव्या ग्राम सचिवालयाचे लोकार्पण खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सवरा यांनी ग्रामसचिवालयासमोरील रस्ता तसेच पूर्व - पश्चिम जोडणार्‍या पादचारी पुलासाठी मंजुरीचे आश्वासन दिले.
             लोकार्पण सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायतीमार्फत मोफत आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, वजन, रक्तगट आदी तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सुमारे ४०० महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून साड्यांचे वाटप करण्यात आले. कांदळवन समितीअंतर्गत २७ महिला बचत गटांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. सरपंच कुणाल पाटील यांनी ग्राम सचिवालय उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते इमारत पूर्णत्वास नेण्यापर्यंत सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानून योगदान देणार्‍यांच्या सन्मानार्थ शिलाफलक उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.             
              ग्राम सचिवालय उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तहसीलदार रमेश शेंडगे, तलाठी संजय चुरी, सर्कल अधिकारी अनिल वायाळ, मेहुल पाटील, कुंदन संखे तसेच विनोद पाटील, माजी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

            या ग्राम सचिवालयामुळे ग्रामस्थांना विविध प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. उपसरपंच किरण संकेत,तंटामुक्ती अध्यक्ष महोतुल पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच,सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments