https://youtu.be/MhU5I83XdCY?si=5jrLCCNH7jZbavdt
वाचन संस्कृतीतून गावाचा विकास — शिरीष कुलकर्णी
पालघर | प्रतिनिधी
मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना “पुस्तक पेटी भेट” हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाले, “गावात वाचनालय सुरू केल्याने त्या गावाचा सांस्कृतिक विकास घडतो. वाचनामुळे विचारसमृद्धी होते आणि समाजाला दिशादर्शन मिळते. त्यामुळे प्रत्येक गावात वाचनालय उभारले जावे, यासाठी ‘पुस्तक पेटी भेट’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.”
यावेळी पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर, सकाळ समूहाचे वरिष्ठ पत्रकार पी. एम. पाटील, पत्रकार व शिक्षक जतीन कदम, तसेच सफाळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव अमोल पाटकर यांनी सांगितले की, “लवकरच पालघर जिल्ह्यातील इतर शाळांनाही पुस्तक पेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम जिल्हा पातळीवर राबविला जाणार आहे.”
या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवून समाजातील ज्ञानजागृतीस चालना देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात येत आहे.