दिव्यांगांप्रती संवेदनशीलतेने वागणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी — जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख

Date: 2025-10-18
news-banner
https://youtu.be/9zF1gAV_Uh4?si=o6zI8b8KrCM_ylGd

दिव्यांगांप्रती संवेदनशीलतेने वागणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी — जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख

‘दिव्यांग हे विशेष सक्षम’ — जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

पालघर, १७ :

“शासनाने दिव्यांगांना सामाजिक जबाबदारी म्हणून पाहत ‘अपंग’ हा शब्द बदलून ‘दिव्यांग’ असा संवेदनशील बदल केला आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने सातवरून २१ पर्यंत दिव्यांगांच्या प्रकारांची व्याप्ती वाढवत आणि विविध तरतुदी करून शासनाने आपला बदलता दृष्टिकोन दाखवून दिला आहे,” असे जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले. जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित ‘दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती’ या राज्य व केंद्र शासनाच्या वर्ग एक व दोन अधिकाऱ्यांसाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

“आपण प्रत्येकाने दिव्यांगांशी मैत्रीपूर्ण नातं जोडलं पाहिजे. आपली कार्यालये त्यांच्यासाठी सहज प्रवेशयोग्य व सहज वावरता येण्याजोगी करावीत आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे ते पुढे म्हणाले.

“माझे वडील पोलिओग्रस्त होते. दिव्यांग म्हणून मिळालेल्या नोकरीमुळे माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले आणि आज मी या पदावर आहे. त्यामुळे संधी दिल्यास दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात,” असा स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगताना ते म्हणाले.

त्यांनी पुढे एका घटनेचा उल्लेख करत, दिव्यांग महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात विशेष दुभाषाच्या मदतीने गुन्ह्याची नोंद घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती दिली.


कार्यशाळेला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी,

“दिव्यांग हे ‘विशेष सक्षम’ आहेत, ‘अक्षम’ नाहीत,” हे अधोरेखित करताना, त्यांच्या विषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

“दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे राबविणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. प्रशासन संवेदनशील झाले तरच दिव्यांग सक्षमीकरणाची दिशा दृढ होईल,” असे त्या पुढे म्हणाल्या.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी,

“दिव्यांगांसाठी कार्यालयीन सुलभता, मानसन्मान आणि कायद्यांविषयी माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे,” असे सांगितले.

 “दिव्यांगांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. त्यांच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांनी दिव्यांगांसाठी एक व पाच टक्के राखीव निधी आणि विविध नाविन्यपूर्ण योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
सहायक आयुक्त (कौशल्य विकास) रेणुका तम्मलवार यांनी कौशल्यवर्धनाच्या योजनांबाबत माहिती दिली.

कार्यशाळेत ऍड. राऊत यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी तर ऍड. राहुल ठाकरे यांनी दिव्यांग हक्कांविषयी माहिती दिली.

या कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद शरीक-मसलत तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेत दिव्यांग प्रतिनिधींनी दिव्यांगांच्या हक्कांविषयी, शासनाच्या योजनांविषयी आणि सक्षमीकरणातील प्रशासनाच्या भूमिकेविषयी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश चव्हाण यांनी केले.

Leave Your Comments