जव्हारजवळ एसटी बसचा भीषण अपघात; १७ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर चौथ्याची वाडी (जव्हार), १५ नोव्हेंबर २०२५

Date: 2025-11-18
news-banner
जव्हारजवळ एसटी बसचा भीषण अपघात; १७ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
चौथ्याची वाडी (जव्हार), १५ नोव्हेंबर २०२५

जव्हार–ऐना मार्गावर धावणारी एसटीची बस (क्र. एम एच १४ बीटी २३४२) शनिवारी सकाळी चौथ्याची वाडी परिसरात तीव्र उतारावर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १८ पैकी १७ प्रवासी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघात सकाळी ११.१५ ते ११.३० या वेळेत झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला वळसा देण्याच्या प्रयत्नात एसटी बस चालकाचा तोल सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला खोल उताराकडे सरकून पलटी झाली. चालक सुभाष रघुनाथ गावित (बि.क्र. ४२२३५) आणि वाहक योगेश देवराम गवारी (बि.क्र. ७६०९) हे दोघेही जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. तत्पूर्वीच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना तातडीची मदत पुरवून त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जव्हार आगार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, तसेच विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांनी अपघात स्थळी भेट दिली. तसेच जव्हार पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला.

एसटी विभागाने सांगितले की, हा अहवाल प्राथमिक असून अपघाताचे कारण, तांत्रिक बाबी आणि जबाबदारी याबाबतचा सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Leave Your Comments