नवयुग पालघर ०७ डिसेंबर :
राज्य कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत पालघर जिल्हा कुमारी संघ अजिंक्य
पालघर जिल्ह्याच्या कुमारी संघाने स्पर्धेतील बलाढ्य समजल्या जाणार्या पुणे जिल्हा संघास अंतिम सामन्यात मात देत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या ५२ व्या अजिंक्यपद कुमारी निवड चाचणीचे अजिंक्यपद पटकाविले. पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये ३१ जिल्हे सहभागी झाले होते. त्यामध्ये पालघर जिल्हा कुमारी संघाने ठाणे, हिंगोली, नंदुरबार, रायगड, सांगली व अंतिम सामन्यात मातब्बर पुणे या संघास नमवून विजेतेपद पटकाविले.
संपूर्ण स्पर्धेत संजना भोईर हिने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघासह प्रेक्षकांनाही प्रभावित केले. त्याचप्रमाणे संघाची कर्णधार ग्रीष्मा वनारसे हिच्या नेतृत्वाखाली पूर्ण संघाने एकजुटीने खेळ करून आपली गुणवत्ता दाखविली व हे यश मिळविले आहे. संघाच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे संघातील किमान तीन ते चार खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील अशी आशा आहे.
किशोर किशोरी अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये किशोर गटांनी द्वितीय क्रमांक पटकविला. त्यातील महाराष्ट्राच्या संघामध्ये कुमार ध्रुव संदीप डोंगरे- हालोली याची निवड झाली आहे.
विजेत्या संघाचे अभिनंदन !