नवयुग पालघर
**पारगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा;
१५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान**
“जागवू संवेदना” सेवाभावी संस्था आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा, पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
१३ मार्च २०२६ रोजी आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
१५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रतिसाद वृद्धाश्रम, गिराळे येथील रेश्मा प्रमोद वझे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह परिसरातील व गावातील सुमारे
९० महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रभाकर भोईर यांनी केले. मार्गदर्शनपर सत्रात डॉ. रंजना वरसाळे यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, विश्रांती आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच महिलांना होणाऱ्या कर्करोगाबाबत सावधगिरी आणि वेळेवर उपचारांची गरज अधोरेखित केली.
यानंतर विस्तार अधिकारी (शिक्षण) बीट – पारगाव आणि “जागवू संवेदना” संस्थेच्या अध्यक्षा वंदना परशुराम पाटील यांनी माता व पाल्याचे शिक्षण यांचा सहसंबंध या विषयावर मार्गदर्शन केले. गर्भसंस्कारापासून ते बालसंस्कारक्षम वयापर्यंत मुलांच्या घडणीत आई-वडिलांची भूमिका किती महत्त्वाची असते, याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या अपेक्षा व विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करून आनंददायी शिक्षण कसे घ्यावे यावरही त्यांनी भाष्य केले.
कार्यक्रमात मुख्याध्यापिका सुजाता वर्तक, जागवू संवेदना संस्थेचे सचिव अभय वर्तक आणि सहसचिव तुषार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र वझे गुरुजी यांनी सासर व माहेर येथे महिलांची भूमिका या विषयावर परिसरातील वास्तव परिस्थिती मांडत महिलांनी एकमेकींना आधार देण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जागवू संवेदना संस्थेच्या प्रतिभा ठाकूर, नीता राऊत, दीपा पाटील, मिलिंद पाटील, अशोक पाटील आणि रोहन राऊत यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पंचायत समितीच्या माजी सदस्य, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षणप्रेमी आणि गावचे पोलीस पाटील यांचीही उपस्थिती होती.
शेवटी, अभय वर्तक यांनी आभार मानले.