महसूल सेवा गावपातळीवर; प्रतिसादातून प्रशासनाच्या तत्परतेची गरज अधोरेखित तलासरीतील ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Date: 2026-05-18
news-banner
नवयुग पालघर 

**महसूल सेवा गावपातळीवर; प्रतिसादातून प्रशासनाच्या तत्परतेची गरज अधोरेखित
तलासरीतील ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद**

                तलासरी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १” ला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रशासन लोकाभिमुख आणि कामात अधिक तत्पर असण्याची गरज अधोरेखित झाली. महसूल विभागाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचल्यास नागरिकांना होणारा दिलासा या शिबिरातून स्पष्टपणे दिसून आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या विशेष शिबिराचे आयोजन तलासरी नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा तळागाळापर्यंत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. विविध शासकीय सेवा एका छताखाली आणि तत्काळ मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

            शिबिरामध्ये सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत विविध महसुली सेवा तत्काळ देण्यात आल्या. तलासरी नगर पंचायतमार्फत 
३५ विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर तहसील कार्यालयामार्फत २७ प्रमाणपत्रे नागरिकांना देण्यात आली. पुरवठा विभागाने ६९ शिधापत्रिकाधारकांना लाभ उपलब्ध करून दिला.
डिजिटल सेवांनाही प्राधान्य देण्यात आले. महसूल विभागामार्फत ८५ डिजिटल ७/१२ उतारे आणि ११९ ‘८अ’ उतारे वितरित करण्यात आले. कुळ कायदा कलम ४३ अंतर्गत भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भातील ८ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. ‘जिवंत ७/१२’ उपक्रमाच्या टप्पा १ व २ अंतर्गत प्रलंबित ६९ नोंदींची पूर्तताही करण्यात आली.
सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत २७ लाभार्थ्यांची नोंद घेण्यात आली. “शाळा तेथे दाखला” उपक्रमांतर्गत तब्बल २५७ विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाल्याने शिबिराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

           या शिबिराला तलासरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमडा, नगरसेवक विलास ठाकरे, रमिला जवलिया, तहसीलदार अमोल पाठक, तालुका कृषी अधिकारी 
रघु ईभाड, पंचायत समिती कृषी अधिकारी गावीत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave Your Comments