धानीवारीजवळ भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेल्या आयशरला ट्रेलरची जोरदार धडक, १३ ठार; अनेक जखमींवर उपचार सुरू

Date: 2026-05-18
news-banner
**धानीवारीजवळ भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेल्या आयशरला ट्रेलरची जोरदार धडक, 
१३ ठार; अनेक जखमींवर उपचार सुरू**

        पालघर जिल्ह्यातील धानीवारी गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (१८ मे) सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात घडून १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या आयशर टेम्पोला भरधाव ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की अनेक प्रवासी वाहनात अडकून पडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

              प्राथमिक माहितीनुसार, साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेला आयशर टेम्पो (एमएच ४८ डीसी ७४७४) अंदाजे ३० ते ४० प्रवाशांना घेऊन मुंबई-गुजरात मार्गावर प्रवास करत होता. धानीवारीजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रेलरने (एनएल ०१ एसी ९११८) नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशरच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. याचवेळी एक मोटारसायकल (एमएच ०४ ईएम ८४२५) देखील या भीषण अपघातात सापडली.

             अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस, महामार्ग पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य युद्धपातळीवर राबवत जखमींना बाहेर काढण्यात आले.

            अपघातातील १४ जखमींना तातडीच्या उपचारासाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

           या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुऱ्हाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी आणि रियांक्षी संतोष लाखात.

             अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी समन्वय साधत असून मदतकार्य सुरू आहे.

             प्राथमिक तपासात ट्रेलरचा भरधाव वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असावे, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave Your Comments