जिल्ह्यात ५ ठिकाणी झालेल्या‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात नागरिकांना शासकीय सेवांचा तत्काळ लाभ

Date: 2026-03-18
news-banner
नवयुग पालघर 

**जिल्ह्यात ५ ठिकाणी झालेल्या‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात नागरिकांना शासकीय सेवांचा तत्काळ लाभ**
                शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ अंतर्गत पालघर जिल्ह्यात मनोर, खोडाळा, तलासरी, देहर्जे (ता. विक्रमगड) आणि चालतवड (ता. जव्हार) या पाच ठिकाणी आयोजित शिबिरांत नागरिकांना महसूल, कृषी, सामाजिक व इतर शासकीय विभागांच्या सेवा “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी”च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांशी संबंधित सामान्य व प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यात आला. विशेषतः ७/१२ व ८-अ उतारे वितरण व अद्ययावत करणे, डिजिटल सातबारा, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, दुय्यम शिधापत्रिका वाटप, पीएम किसान योजनेचे मार्गदर्शन, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजना, आरोग्य तपासणी तसेच विविध दाखले वितरण अशा सेवा सर्व शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना अनेक कामांसाठी कार्यालयांचे फेरफटके मारावे लागत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

*मनोर येथे शिबिर*
मनोर येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व महाविद्यालय येथे खासदार डॉ. हेमंत सवरा व आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी महेश सागर, प्रांताधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ७/१२ व ८-अ उतारे वितरण, प्रॉपर्टी कार्ड, वनपट्ट्यावर सातबारा नोंद, लक्ष्मी मुक्ती योजना, आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले.

*खोडाळा येथे मंडळस्तरीय शिबिर*
ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा येथे आयोजित मंडळस्तरीय शिबिराचे उद्घाटन माजी सभापती प्रदीप वाघ, अपर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत व मिलिंद झोले यांच्या हस्ते झाले.
येथे जातीचे व डोमिसाईल दाखले वाटप, आधार नोंदणी व दुरुस्ती, डिजिटल सातबारा, शिधापत्रिका सेवा, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी ई-केवायसी, मतदार नोंदणी तसेच विविध विभागांच्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.

*तलासरी येथे महसूल शिबिर*
तहसील कार्यालय, तलासरी येथे आयोजित शिबिराला आमदार विनोद निकोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमडा तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांना सातबारा उतारे, दाखले, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, पीएम किसान योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, लक्ष्मी मुक्ती योजना व प्रॉपर्टी कार्ड यांसह विविध सेवा देण्यात आल्या.

*देहर्जे (विक्रमगड) येथे शिबिर*
ग्रामपंचायत कार्यालय, देहर्जे येथे उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार मयूर चव्हाण व सरपंच प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.
या ठिकाणी नागरिकांना ७/१२ व ८-अ उतारे वितरण, अभिलेख दुरुस्ती, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, सामाजिक योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी तसेच मोफत डिजिटल सातबारा देण्यात आले. यावेळी गर्भवती महिलांना ‘बेबी किट’चे वाटप तसेच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व पॉवर टिलरचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले.

*चालतवड (ता. जव्हार) येथे शिबिर*
हनुमान मंदिराजवळ चालतवड येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जव्हार उपविभागीय अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये डिजिटल गाव नमुना ७/१२, ८-अ व १८६ उतारे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले.
पुरवठा विभागाकडून नवीन व विभक्त शिधापत्रिका अर्ज स्वीकारून अनेकांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच आधार नोंदणी-दुरुस्ती, पीएम किसान व संजय गांधी योजनेची केवायसी, ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण करण्यात आले.
या पाचही ठिकाणी आयोजित महसूल समाधान शिबिरांमुळे महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा झाला. शासनाच्या “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व जलदगतीने मिळत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे .

Leave Your Comments