निर्भय बनो आंदोलन 'ला २०२६ चा निर्भय पुरस्कार जाहीर शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी निर्भय जन संस्थेच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांना प्रदान करणार

Date: 2026-03-18
news-banner
**'निर्भय बनो आंदोलन 'ला २०२६ चा निर्भय पुरस्कार जाहीर
शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी निर्भय जन संस्थेच्या 
३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांना प्रदान करणार **

            महाराष्ट्रात लोकशाही मूल्यांचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भयमुक्त समाजनिर्मितीसाठी उभे राहिलेले 'निर्भय बनो' आंदोलन हे एक प्रभावी लोकआंदोलन आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि अॅड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीने महाराष्ट्रभर सभा, संवाद आणि जनजागृतीद्वारे नागरिकांना एकत्र आणत संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे.

            देश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय, सामाजिक, धार्मिक वातावरण दूषित झाले आणि या विषयांवर उघडपणे भाष्य करण्यास कुणी तयार नाही तेव्हा 'निर्भय बनो' आंदोलनाने निर्भयपणे सभा-संवाद आयोजित करून या दहशतीविरोधात ठाम आवाज उठवला व सत्य लोकांसमोर मांडण्याचे कार्य केले.

             या उल्लेखनिय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल निर्भय जनसंस्थेने 'निर्भय बनो आंदोलना'स निर्भय पुरस्कार-२०२६ प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा पुरस्कार समारंभ शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मैदान, नंदाखाल, विरार (प), वसई येथे संपन्न होणार आहे.

         या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रेव्ह. बिशप थॉमस डिसोजा (वसई) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम कांबळे (ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत) उपस्थित राहणार आहेत.

         या प्रेरणादायी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्भय विचारांना बळ द्यावे असे आवाहन निर्भय जन संस्थेचे मनवेल तुस्कानो यांनी केले आहे.

Leave Your Comments