जिल्हा परिषदेतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी MSRLM मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांचा पालघर दौरा

Date: 2025-12-19
news-banner
जिल्हा परिषदेतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी MSRLM मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांचा पालघर दौरा

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (MSRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ४ डिसेंबर रोजी पालघर तालुक्यातील विविध महिला बचतगट, स्वयंरोजगार उपक्रम आणि उद्योजकता विकास केंद्रांना भेट देत कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना व निर्देश दिले.

दौर्‍याच्या सुरुवातीस सागर यांनी स्वामिनी उद्योग समूहाच्या उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. उत्पादने, विक्री स्थिती, नफा-तोटा तपशील, गुणवत्ता, पॅकेजिंग व ब्रँडिंग यांचे परीक्षण करत स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत बाजारपेठ विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. महिला बचतगट अधिक सक्षम व्हावेत यासाठी विशेष मार्गदर्शनही केले.

त्यानंतर BRC/SVEP केंद्रास भेट देत उद्योजकता प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व बाजारपेठ जोडणीसंबंधी उपक्रमांची माहिती घेतली. स्वरोजगार इच्छुकांना अधिक प्रभावी मदत मिळण्यासाठी दिलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करावी, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

वडराई येथील मासे विक्री उत्पादक गटाच्या भेटीत विक्री पद्धती, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक आणि उत्पन्न स्थितीचा आढावा घेत व्यवसाय अधिक शाश्वत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्राहकांशी थेट संपर्क वृद्धिंगत करून नफा वाढविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

दुपारनंतर जिल्हा परिषद हुतात्मा सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत विविध योजना, SMART उपक्रम, उद्दिष्टपूर्ती आणि लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेची सविस्तर चर्चा झाली.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे, अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक डॉ. सातपुते, गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी बापूराव नाळे, DMM रवी बोबडे, तालुका मिशन मॅनेजर, ब्लॉक मिशन मॅनेजर तसेच कम्युनिटी को-ऑर्डिनेटर उपस्थित होते.

महिलांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणे, स्वयंरोजगार संधी वाढवणे आणि गटांची कार्यक्षमता उंचावण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave Your Comments