महिलांच्या सहभागातून उमरोळीचा सांस्कृतिक उत्सव

Date: 2026-01-19
news-banner
महिलांच्या सहभागातून उमरोळीचा सांस्कृतिक उत्सव

महिलांच्या सन्मानातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा “मेळा – महिलांचा सन्मान : हळदी-कुंकू कार्यक्रम” उमरोळी ग्रामपंचायतीच्या वतीने १६ जानेवारी २०२६ रोजी उमरोळी क्रिकेट ग्राउंड येथे अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. “नारी सन्मान म्हणजे समाजाचा खरा विकास” या प्रेरणादायी विचाराला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात गावातील बचत गटांच्या महिला, महिला मंडळे, उत्कर्ष ग्राम संघाच्या सीआरपी, ग्राम संघातील सर्व बचत गट, तसेच ज्येष्ठ महिला व माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उज्वला काळे (माजी नगराध्यक्ष), सुनीता अथले (सहायक पोलीस निरीक्षक) आणि वैदेही वाढाण (माजी जिल्हा परिषद सभापती) यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी मेळाव्यात रंगत आणली. सोनाली पाटील (आई तुळजाभवानीची मुख्य कलाकार), विद्या सदाफुले (लावणी सम्राट) आणि योगेश केळवेकर (डान्स कोरिओग्राफर) यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य-गीतांच्या माध्यमातून आपली संस्कृती सादर करत व्यासपीठ उजळून टाकले. लोककला, परंपरा आणि स्त्रीशक्ती यांचा सुरेख संगम या मेळाव्यात अनुभवायला मिळाला.
या प्रसंगी ग्रामपंचायत उमरोळीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावातील इयत्ता दहावी (SSC) गुणवंत विद्यार्थिनींचा त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल गौरव करण्यात आला. तसेच कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता प्रामाणिकपणे व सातत्याने सेवा देणाऱ्या महिला बाजार सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मेळाव्यातील सर्वात भावस्पर्शी व ऐतिहासिक क्षण म्हणजे सुईण महिलांचा सत्कार. आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, पिढ्यान्-पिढ्या मातृत्वाची जबाबदारी सांभाळत असंख्य जीवांना सुरक्षित जन्म देणाऱ्या सुईण महिलांनी समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा पाया घातला. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे अनेक कुटुंबांचे संसार फुलले असून, हा सत्कार म्हणजे समाजाने त्यांच्या ऋणातून उतरायचा केलेला एक छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महिलांना आत्मसन्मान, कायदेविषयक जागरूकता, सामाजिक सहभाग, कौटुंबिक व आर्थिक सबलीकरण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

हा मेळावा केवळ कार्यक्रम न राहता, महिलांच्या एकतेचा, सहभागाचा व सशक्तीकरणाचा आदर्श नमुना ठरला असून, ग्रामपंचायत उमरोळीच्या सामाजिक बांधिलकीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

या यशस्वी उपक्रमासाठी सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच भरत वनमाळी, तसेच ग्रामपंचायत सदस्य भाविका राऊत, नम्रता पाटील, जयमाला मोरे, हेमांगी कुडू, सारिका पाटील, कल्पना मेढे, सुमित वझे, राजनेश पाटील, अनिल तरे, दीपेश पाटील आणि ग्रामसेवक श्रीकांत मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave Your Comments