सार्वजनिक सुट्टीतही सुरू राहणार दुय्यम निबंधक ( दस्त नोंदणी) कार्यालये; खरेदी-विक्री व्यवहार करू इच्छिणाऱ्याना दिलासा

Date: 2026-03-19
news-banner
*नवयुग पालघर : 

**सार्वजनिक सुट्टीतही सुरू राहणार दुय्यम निबंधक ( दस्त नोंदणी) कार्यालये; खरेदी-विक्री व्यवहार करू इच्छिणाऱ्याना दिलासा**

पालघर, दि. १७ मार्च : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपुष्टात येत असून नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये आता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी संबंधित कार्यालये नियमित वेळेत कार्यरत राहणार आहेत.

या निर्णयामुळे वसई (क्र. १ ते ६), पालघर (क्र. १ व २), डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा येथील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार-रविवार व्यतिरिक्त इतर दिवशी असते, त्यांनी त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस सुरू ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही या कालावधीत कार्यरत राहणार आहेत. मुद्रांक शुल्क, अभिनिर्णय व इतर प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ही व्यवस्था नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

Leave Your Comments