टेंभोडेतील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात १७८९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Date: 2026-05-19
news-banner
**टेंभोडेतील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात १७८९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ**

           पालघर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी कोळगाव कार्यक्षेत्रातील मौजे टेंभोडे येथे शुक्रवार, १५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून एकूण १७८९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. शिबिरात महसूल विभागाच्या मोफत सातबारा, फेरफार उतारे, ८-अ उतारे, जातीचे व उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, भूमी अभिलेख विभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, नगरपरिषद पालघर, वन विभाग आदी मिळून १९ विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

           शिबिरासाठी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक राहुल पाटील, राधा पामाळे, आरिफ कलाडिया, अमोल पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल गावड, माजी नगरसेवक सुभाष पाटील, धनसार सरपंच राखी रविंद्र पाटील, शिरगाव सरपंच घनश्याम मोरे, उमरोळी सरपंच प्रभाकर पाटील, दापोली सरपंच हेमंत संखे, नायब तहसीलदार संभाजी पावरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

             यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी स्वतःच्या शिक्षणकाळातील अनुभव सांगताना आवश्यक दाखले मिळविण्यासाठी त्यांना किती हेलपाटे घालावे लागले होते, याची आठवण करून दिली. शेवटी महसूल खात्यात जाऊन जाब विचारण्याचा इशारा दिल्यानंतरच दाखले मिळाल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. याच अनुभवातून पुढे रायगड जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी असताना शालेय विद्यार्थ्यांना थेट शाळेत दाखले देण्याचा उपक्रम राबविल्याचे सांगितले. हा उपक्रम पुढे राज्यभर राबविला गेला असून अशा अभियानांमुळे नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या लाभांची माहिती देत या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. 
         तहसीलदार रमेश शेंडगे यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट करत एकाच ठिकाणी, त्याच दिवशी नागरिकांना विविध दाखले व सेवा उपलब्ध करून देण्यामागील प्रशासनाची भूमिका मांडली.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गावड यांनी टेंभोडे गावात हे शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.
           मंडळ अधिकारी अनिल वायाळ, ग्राम महसूल अधिकारी संदेश पाटील, निलेश भसरा, विठ्ठल वैद्य, कृष्णा भोईर, सीमा इंगळे तसेच मंडळातील इतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या नियोजन व अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली.

Leave Your Comments