**बोईसरमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश; पश्चिम बंगालच्या सराईत चोराला अटक, चोरीची स्प्लेंडर जप्त**
बोईसर रेल्वे ब्रिज परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरी करून पसार झालेल्या पश्चिम बंगालमधील सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-४८/बीवाय-४१९१) मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीवर यापूर्वी ठाणे शहर, मीरा-भाईंदर-वसई-विरार आणि बृहन्मुंबई परिसरात चोरी व जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
२४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५५ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान बोईसर पूर्व येथील रेल्वे ब्रिजजवळील दांडीपाडा परिसरात राहणारे मयंक राजेश यादव (वय २२) यांनी आपली मोटारसायकल पार्क केली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्याची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ४८) याच्यावर संशय बळावला. आरोपी सध्या यादवनगर, रघुवीर शाळेजवळ, शिगाव रोड, बोईसर येथे राहत असून तो मूळचा ग्राम दलवाड, पोस्ट कडवाड, तालुका भगवानपूर, जिल्हा पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.
११ मे रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सपोनि योगेश शिंदे, पोउनि गोरखनाथ राठोड, पोहवा कैलास पाटील , पोहवा दिनेश गायकवाड, पोहवा संजय धांगड, पोअंम वैभव जामदार आणि पोअंम महेश अवतार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.