करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची राज्यस्तरीय दखल करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशनात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा मान

Date: 2026-01-19
news-banner
करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची राज्यस्तरीय दखल
करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशनात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा मान

पालघर : विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीसाठी सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबवत शिक्षणाच्या गुणवत्तेत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा उपक्रमाची राज्यस्तरावर गौरवपूर्ण दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशनात महाविद्यालयाला A+ दर्जासह ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रमाणपत्र तसेच तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनात प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण क्षेत्रातील महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याचा हा अधिकृत सन्मान असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
या अधिवेशनात राज्यभरातील विविध महाविद्यालयांनी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत राबविलेल्या नवोन्मेषी उपक्रमांचा, उद्योग–शिक्षण समन्वयाचा, करिअर मार्गदर्शन पद्धतींचा तसेच कौशल्य विकास उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने या सर्व निकषांवर सातत्यपूर्ण प्रगती साधत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिल्यामुळेच हे मानांकन मिळाल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले,
“करिअर कट्टा हा केवळ मार्गदर्शनाचा उपक्रम नसून ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ आहे. तंत्रज्ञान, उद्यमशीलता आणि कौशल्य विकासाची सांगड घालून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे.”
या वेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर तसेच महाराष्ट्र राज्य तांत्रिक सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शीतोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी रोजगार बाजारातील बदलते प्रवाह, नव्या तंत्रज्ञानाधारित संधी, उद्योजकता, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योगाधिष्ठित शिक्षण यावर मार्गदर्शन करताना भारतात कामाला अपेक्षित सन्मान मिळत नसल्याबद्दल खंतही व्यक्त केली.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत कौशल्य विकास कार्यशाळा, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, करिअर समुपदेशन तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम नियमितपणे राबविले जातात. या सन्मानामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयाला मिळालेला A+ दर्जा हा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ आणि डॉ. महेश देशमुख यांनी व्यक्त केली.
या अधिवेशनासाठी समिती अध्यक्ष व समन्वयक प्रा. संतोष सिरसाट, प्रा. योगिनी कोकाटे, विद्यार्थी संसद प्रतिनिधी मनीष चौधरी, संस्कृती तांडेल, आचल यादव आणि निर्मला राजपूत यांनी सहभाग नोंदवला. तसेच समन्वयक प्रा. तेजस चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पुढील काळात आणखी नवोन्मेषी करिअर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave Your Comments