दोन शाळकरी मुलींचा मृत्यू ओढवलेल्या सुकडआंबा येथील टाक्या नव्याने उभारण्याचे काम सुरु
डहाणू तालुक्यातील सुकडआंबा गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत घडलेल्या भीषण घटनेत दोन शाळकरी मुलींचा बळी गेल्यानंतर गावकऱ्यांच्या रोषाची दखल घेत प्रशासनाने ठोस सकारात्मक पावले उचलत, धोकादायक ठरलेल्या जुन्या उंच पाणी साठवण टाक्या पाडून त्यांच्या जागी नव्या टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या योजनेतून मार्च २०२६ पर्यंत गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सुकडआंबा येथील शिरसोनपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या उंच पाणी साठवण टाकीच्या टॉप स्लॅबलगतचा लँडिंग स्लॅब अचानक कोसळून दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता आणि योजनेच्या बांधकामाच्या दर्जावर तसेच सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
या घटनेनंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात सदर पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट तिन्ही उंच पाणी साठवण टाक्या असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ३ जुलै २०२५ रोजी संबंधित कंत्राटदारास तिन्ही टाक्या पाडण्याचे आदेश दिले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार डिसेंबर २०२५ मध्ये पाटीलपाडा, जुनुनपाडा आणि शिरसोनपाडा येथील तिन्ही उंच पाणी साठवण टाक्या कंत्राटदारामार्फत पूर्णपणे पाडण्यात आल्या. त्यानंतर आदेशांचे पालन करत सुरक्षिततेचे सर्व निकष लक्षात घेऊन नव्या टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सध्या या तिन्ही ठिकाणी उंच पाणी साठवण टाक्यांचे काम प्रगतीपथावर आहे.
प्रशासनाच्या निर्देशानुसार व तांत्रिक मानकांचे काटेकोर पालन करून हे काम सुरू असून, सर्व टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून सुकडआंबा पाणीपुरवठा योजनेतून मार्च २०२६ पर्यंत गावात पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेमुळे सुकडआंबा गावातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.