गडचिंचलेची घटना आणि भाजपची कोंडी

Date: 2025-11-19
news-banner
जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ चौधरी यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर भाजपाला चहुबाजूंनी घेरले जात आहे. आपणच रचलेल्या सापळ्यात भाजप अडकला आहे. दुसऱ्या बाजूने आरोपी दर्शविले जात असल्याने, चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे... या पार्श्वभूमीवर नवयुग पालघर १६ नोव्हेंबर अंकातील हे संपादकीय .....

गडचिंचलेची घटना आणि भाजपची कोंडी 

  भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ( समाजमाध्यमावर प्रचंड टीका झाल्यानंतर नंतर स्थगिती दिली ) माजी जिल्हा परिषद सभापती काशिनाथ चौधरी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना, यातही, त्यांच्या तरुण महाविद्यालयीन मुलाला ज्या मानसिक यातनांना सामोरे जावे लागत आहे, त्याला जबाबदार कोण आहे हे एव्हाना सर्वांसमोर आलेले आहे. गडचिंचले येथील साधू हत्याकांडाच्या घटनेनंतर काशिनाथ चौधरी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे सेना होते. त्याच भाजपने काशिनाथ चौधरी यांना सन्मानाने आपल्या पक्षात प्रवेश दिला.तदनंतर समाजमाध्यमावर जे चित्र दिसले, त्यातून भाजपला एक पाऊल (तात्पुरते ?) मागे यावे लागले. अलीकडे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात जे वास्तव समोर ठेवले आहे, त्यातून भाजपचा खरा चेहरा पूर्वीच उघड झालेला आहे.  
 गडचिंचले हत्याकांड ही २०२० मधील घटना. २०२२ मध्ये शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यानंतर या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. साधू हत्याकांडाच्या घटनेने मला झोप लागली नाही आणि यातूनच महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्याचा/सरकार पाडण्याचा मी निर्णय घेतला असे त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाल्याचे सावंत यांनी दाखवून दिले आहे. १२ ऑक्टोबर २०२२ मध्ये सीबीआयकडे तपास देण्याचा निर्णय झाल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२४ रोजी आम्ही या गुन्ह्याचा तपास सीबीआय कडे वर्ग करत असल्याचा आदेश युती सरकारने काढला. पुढे दीड वर्षानंतर फेब्रुवारी २०२४ च्या आदेशातील कलमे चुकीची आहेत हे सरकारच्या लक्षात आलं, आणि मे २०२५ मध्ये शुद्धिपत्रक काढून कलमं बदलून या नवीन कलमांतर्गत तपास करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले.ज्या घटनेबद्दल भाजप/शिंदे सेना आणि समर्थक वारंवार समाजमाध्यमांवर बोलत राहिले, आपला राजकीय मुद्दा रेटत राहिले, त्या प्रकरणातील ही गती काय दर्शविते ?
 तदनंतर अलीकडे, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सीबीआयने यासंदर्भातला एफआयआर दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर लगेचच,या गुन्ह्या संदर्भात कासा पोलीस स्टेशनमध्ये जे तीन एफआयआर नोंदविण्यात आलेले आहेत, हे एफआयआर तेच आहेत असे सावंत यांनी दाखवून दिले आहे. हा घटनाक्रम आणि हे वास्तव यावरून स्पष्ट दिसते की भाजपाने या घटनेचा वापर राजकीय हेतूसाठी केला. आपल्या हिंदुत्वाचे राजकारण करण्यासाठी केला. या घटनेतील साधूंनी, ते जिवंत असताना जो जबाब दिलेला आहे, त्यामध्ये आम्ही मुले पळवत आहोत असे समजून लोक आम्हाला मारहाण करत आहेत असेही स्पष्टपणे म्हटल्याचे सावंतांनी सांगितले आहे. असे असताना आपल्या राजकारणासाठी कोणाचा बळी का देण्यात यावा हा प्रश्न आहे. 
 काशिनाथ चौधरी हे या गुन्ह्यातील आरोपी नाहीत. किंबहुना साक्षीदार म्हणून त्यांचा समावेश आहे. पोलिसांनी बोलवल्यामुळे आपण तेथे पोहोचलो हेही त्यांनी वारंवार सांगितलेले आहे. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे सारं केलं गेलं आणि त्याच काशिनाथ चौधरी यांची राजकीय दृष्ट्‌या गरज वाटल्यानंतर भाजपने त्यांना आपल्याकडे घेतलं. आपलाच खेळ आपल्याच अंगाशी आल्याचे यातून भाजपच्या लक्षात आले आहे. मात्र त्याच्या यातना चौधरी सारख्या कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत. 
 या घटनेत सुमारे २०० आरोपी आहेत. यातील अनेकांची बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे. काशिनाथ चौधरी यांचा या गुन्ह्यात सहभाग नव्हता, अशी माहिती मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना प्रवेश दिल्याचे भाजपाकडून सांगितले जाते. मात्र हेच गेले अनेक वर्ष सांगितले जात असताना, विविध तपासानंतर, आरोपी म्हणून नावही नसताना, चौधरीबाबतीत जे घडले ते संतापजनक आहे. या घटनेतील आरोपी आदिवासी आहेत, या गावच्या सरपंच भाजपच्या... याचाही विसर सोयीचे राजकारण करणार्‍यांना पडावा हे आश्चर्यजनकच आहे.

Leave Your Comments