नवयुग पालघर
****मतदान केंद्र प्रतिनिधी नियुक्तीत जिल्ह्यात भाजपची आघाडी; काँग्रेस केवळ दोनवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 9 शून्य तर शिंदे सेना तीन मतदारसंघात शून्यावर****
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत मतदान केंद्र प्रतिनिधी नियुक्तीच्या आकडेवारीत सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांतील मोठी तफावत समोर आली आहे. जिल्ह्यातील २,२७४ मतदान केंद्रांच्या तुलनेत विविध पक्षांनी एकूण केवळ ४,०२१ प्रतिनिधी नेमले आहेत. त्यात भाजपने सर्वाधिक २,११६ एजंट नेमले असून, शिंदे पक्षाने ९४०, उद्धव ठाकरे पक्षाने ६८० एजंट नेमले आहेत. काँग्रेसकडून केवळ २ प्रतिनिधी नियुक्त झाले आहेत, तर बसपने ३५ नेमले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शरद पवार या दोन्ही पक्षांनी एकही प्रतिनिधी नियुक्त केलेला नाही. तसेच माकपने फक्त डहाणू मतदारसंघात मर्यादित उपस्थिती दाखवली आहे.
जिल्ह्यातील एकूण चित्र पाहता भाजपने जवळपास प्रत्येक मतदारसंघात पूर्ण क्षमतेने प्रतिनिधी नियुक्त केले असले तरी पालघर मतदारसंघात ३२४ पैकी केवळ १६८ केंद्रांवरच प्रतिनिधी नियुक्त करू शकले आहेत, मतदान केंद्रांच्या तुलनेत शिंदे सेना देखील मागेच राहिली आहे. विक्रमगड, पालघर मतदारसंघात सर्वच्या सर्व प्रतिनिधी नेमलेल्या शिंदे सेनेला बोईसर व नालासोपारा मतदारसंघात एकही प्रतिनिधी नेमता आला नाही तर वसईत एकच प्रतिनिधी नेमू शकले आहेत. उद्धव ठाकरे सेनेलाही विक्रमगड मध्ये एकही प्रतिनिधी नेमता आला नाही तर डहाणू, बोईसर व नालासोपारा मतदारसंघात त्यांची संख्या दोन अंकीच राहिली आहे. याउलट काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि इतर काही पक्षांची जवळपास शून्य उपस्थिती राहिली जात आहे.
मतदारसंघनिहाय स्थिती अशी :
१२८-डहाणू (३३१ मतदान केंद्रे) - या मतदारसंघात भाजपने सर्व ३३१ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले आहेत. शिंदे सेनेने २५७, ठाकरे सेनेने ७६, काँग्रेसने फक्त १, तर माकपने २४८ एजंट नेमले. एकूण प्रतिनिधी संख्या ९१३ झाली आहे. माकपची जिल्ह्यातील एकमेव लक्षणीय उपस्थिती याच मतदारसंघात दिसते.
१२९-विक्रमगड (३५८ मतदान केंद्रे) - येथे भाजपने ३५६ आणि शिंदे सेनेने सर्व ३५८ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले आहेत. मात्र काँग्रेस, ठाकरे सेना आणि माकप यांची संख्या शून्य आहे. एकूण संख्या ७१४.
१३०-पालघर (३२४ मतदान केंद्रे) - या मतदारसंघात शिंदे सेनेने सर्व ३२४ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले असून ठाकरे सेनेने २५१, भाजपने १६८ आणि काँग्रेसने फक्त १ प्रतिनिधी नेमला आहे. दोन्ही राष्ट्रवादी व माकप येथे पूर्णपणे अनुपस्थित आहे. एकूण संख्या ७४४.
१३१-बोईसर (४०४ मतदान केंद्रे) - भाजपने सर्व ४०४ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले आहेत. ठाकरे सेनेने ५५, बसपने २६ प्रतिनिधी नेमले असून काँग्रेस आणि शिंदे सेनेची तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या शून्य आहे. एकूण ४८५ एजंट.
१३२-नालासोपारा (५०३ मतदान केंद्रे) - भाजपने सर्व ५०३ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले असून ठाकरे सेनेने ८७ प्रतिनिधी नेमले आहेत. काँग्रेस व शिंदे सेनेची व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची उपस्थिती शून्य आहे . एकूण ५९०.
१३३-वसई (३५४ मतदान केंद्रे) - भाजपने सर्व ३५४ केंद्रांवर प्रतिनिधी नेमले आहेत. ठाकरे सेनेने २११, बसपने ९ प्रतिनिधी नेमले असून काँग्रेस शून्यावर आहे. शिंदे सेनेने फक्त १ प्रतिनिधी नेमला आहे. एकूण संख्या ५७५.
एकूण आकडेवारीतून स्पष्ट होते की, पालघर लोकसभा क्षेत्रात भाजपने आपले जाळे उभे केले आहे. शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांची काही मतदारसंघांत उपस्थिती असली तरी ती असमान आहे.