अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशन : ३० हजार महिला रॅली आणि महासभेत सहभागी
https://youtu.be/3VyC-7wE88E?si=-fIEIw4itcouLURy
डहाणू : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे (AIDWA) तेरावे महाराष्ट्र राज्य अधिवेशन डहाणू येथे एक नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाले. सकाळी तारपा चौक ते पारनाका दरम्यान तब्बल ३० ते ३५ हजार महिलांची—बहुसंख्य आदिवासींची—भव्य रॅली काढण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरील प्रभावी सभेत या रॅलीचे रूपांतर झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रगतिशील मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले.
अधिवेशनाच्या उद्घाटन सभेचे अध्यक्षस्थान नसीमा शेख यांनी भूषवले होते. या वेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. पी. के. श्रीमती, सरचिटणीस कॉ. मरियम ढवळे, राष्ट्रीय नेत्या कॉ. प्राची हातवलीकर, महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. लहानी दौडा (पालघर जिल्हाध्यक्ष) आणि कॉ. सुनीता शिंगडा (पालघर जिल्हा सचिव) उपस्थित होत्या.
सभेला डहाणूचे आमदार व स्वागत समिती अध्यक्ष कॉ. विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचारांविरोधात तीव्र आवाज उठवला, तसेच राज्यातील भ्रष्टाचार, ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर सरकारला जाब विचारला.
ते म्हणाले, “राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती एकर ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी.”
“निवडणूक आली की सरकार महिलांना व शेतकऱ्यांना आश्वासनं देते, पण निवडणूक संपली की त्यांच्या फसवणुकीचा सिलसिला सुरू होतो.”असे ते पुढे म्हणाले .
डहाणूच्या समुद्रकिनारी झालेल्या या ऐतिहासिक सभेने केवळ महिलांच्या प्रश्नांवर नव्हे, तर सामाजिक न्याय, शेतकऱ्यांच्या हक्कांपासून ते महिलांच्या सशक्तीकरणापर्यंतच्या लढ्याला नवी दिशा दिली.