बुलेट ट्रेनच्या सर्व्हिस रोडमुळे माकूणसार पूर्व भाग जलमय; ग्रामस्थ, शेतकरी अडचणीत, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Date: 2026-07-02
news-banner
नवयुग पालघर

बुलेट ट्रेन सुसाट... पाणी शेतकऱ्यांच्या शेतात

**बुलेट ट्रेनच्या सर्व्हिस रोडमुळे माकूणसार पूर्व भाग जलमय; ग्रामस्थ, शेतकरी अडचणीत, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप**

              बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या रामबाग ते रोठे येथील प्रीकास्ट यार्डपर्यंत जाणाऱ्या समांतर सर्व्हिस रोडमुळे माकूणसार ग्रामपंचायत हद्दीतील विरावाडी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक नाल्यावर अरुंद सिमेंट पाईप टाकून रस्त्याचे बांधकाम केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा अडथळ्यात आला असून ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

             स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ३० ते ३५ फूट रुंद असलेल्या नैसर्गिक ओहळावर केवळ दोन सिमेंट पाईप टाकण्यात आल्याने हा रस्ता पाण्याला अडविणारा बांध ठरत आहे. पहिल्याच पावसात माकूणसार पूर्व भागात एक ते दीड फूट पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. दुग्ध व्यवसायिकांनाही याचा फटका बसला असून शेतकरी प्रशांत पाटील यांच्या गोठ्यात गुरांसाठी साठवलेले गवत पाण्यात भिजून खराब झाले.

            या समस्येमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण वाढण्यापूर्वी तातडीने नैसर्गिक नाला मोकळा करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भुपेश रमेश म्हात्रे यांनी पालघर तहसीलदारांची भेट घेऊन केली. तसेच जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.

#bullettrain #farmers #districtadministration

Leave Your Comments