विरारच्या बोळींजमध्ये ‘जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल’चे उद्घाटन

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर 
**विरारच्या बोळींजमध्ये ‘जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल’चे उद्घाटन**

          बोळींज व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड’ या अत्याधुनिक रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा १४ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.
             पद्मावती नगर, बोळींज येथील पाच मजली कॉर्नर प्लाझा इमारतीत साकारलेल्या या आधुनिक रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आता विविध वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती स्टीफन थॉमस डी’अल्मेडा आणि प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दुर्गेश श्रीकृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

           उद्घाटनास वसई-विरार महानगरपालिकेच्या नगरसेविका ज्योती मॅडम, रंजना थाळेकर तसेच नगरसेवक डॉमनिक रुमाव यांच्यासह डॉ. सौरभ संगोरे (डायरेक्टर, ग्रुप ऑफ फिनिक्स हॉस्पिटल, मुंबई), डॉ. नितेश सालुंखे (वेल केअर हॉस्पिटल, विरार पश्चिम), डॉ. तेजस दीक्षित, डॉ. दिनेश गंगवानी, डॉ. लालचंद गुप्ता, डॉ. रेहान शेख आदी अनेक मान्यवर वैद्यकीय तज्ज्ञ, समाजसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बिशप थॉमस डिसोजा यांनी, “रुग्णसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल हे पीडितांच्या जखमांवर फुंकर घालणारे आणि गरजूंना आधार देणारे सेवाकेंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला.”

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चार्ल्स डिमेलो यांनी केले. तर डॉ. दुर्गेश जोशी यांनी मनोगत व्यक्त करत रुग्णालयाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली आणि उपस्थितांचे आभार मानले.

रुग्णालय प्रशासनाने ‘जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल’ आजपासून जनसेवेसाठी सज्ज असल्याची घोषणा केली.

Leave Your Comments