विद्यार्थ्यांच्या मनातील भूकंपाची भीती दूर करून जनजागृती घडवण्याचे हे प्रभावी साधन आहे” — प्रा. डॉ. रवी सिन्हा

Date: 2025-10-21
news-banner
“विद्यार्थ्यांच्या मनातील भूकंपाची भीती दूर करून जनजागृती घडवण्याचे हे प्रभावी साधन आहे” — प्रा. डॉ. रवी सिन्हा

आयआयटी मुंबईत ‘लातूर भूकंपातून शिकताना’ कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन


“विद्यार्थ्यांच्या मनातील भूकंपाची भीती दूर करून जनजागृती घडवण्याचे हे एक प्रभावी साधन ठरेल,” असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. रवी सिन्हा यांनी केले. ते ‘जागतिक आपत्ती जोखीम धोके निवारण दिना’निमित्त आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात आयोजित ‘लातूर भूकंपातून शिकताना’ या कॉमिक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमात डॉ. सिन्हा यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे पुस्तक नवीन पिढीसाठी एक महत्वपूर्ण पर्वणी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात हे पुस्तक पोहोचले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विवेकानंद कदम लिखित आणि प्रांजल महेश चौधरी-महाजन यांनी चित्रांकित केलेले हे पुस्तक भूकंपासंदर्भातील माहिती, त्यावेळी घ्यावयाची काळजी आणि आपत्तीपश्चात पुनर्बांधणीचे तंत्र सोप्या व आकर्षक चित्ररूपात सादर करते. ‘पाटकर पब्लिकेशन’, पालघर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

या प्रसंगी प्रा. अलोक गोयल, प्रा. कपिल गुप्ता (आयआयटी मुंबई), शिवाजी बिबराळे (सचिव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना – महाराष्ट्र राज्य), उमेश शिर्के (विभागीय आपत्ती व्यवस्थापक समन्वयक, कोकण विभाग) आणि दीपक शिंदे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंबई उपनगर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच दीपक तोंडारे, राजू बिबराळे, सुनीता बिबराळे, वैभव बिबराल, शैलेंद्र सोनी, सोनम सोनी, मोनी गुप्ता, हरीश कारभारी आणि सचिन जोसेफ यांचाही उपस्थितीत सहभाग होता.

या पुस्तकाच्या निर्मितीत गोविंद बोडके (तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर), सुभाष भागडे (निवासी उपजिल्हाधिकारी), डॉ. प्रमोद पाटील (पीएच.डी. मार्गदर्शक) आणि शरद महाजन (निवृत्त शिक्षक, मनोर) यांचे सहकार्य लाभले.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बालपणीपासून सजगतेची सवय लावण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Leave Your Comments