नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व

Date: 2025-12-21
news-banner
नवयुग पालघर विशेष : 

           नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व

                     भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीत पराभव पत्कारावा लागला .याउलट पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जव्हार व वाडा येथे नगराध्यक्ष पदासह डहाणू, जव्हार व वाडा येथे सर्वाधिक जागा मिळवून सत्ता काबीज करत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे . शिवसेना शिंदे पक्षाने पालघर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेची सत्ताही काबीज केली.डहाणू नगरपरिषदेत शिवसेना शिंदे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सह आघाडी करत नगराध्यक्ष पद पटकावले, मात्र आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने डहाणूत (०८ ) आपले अस्तित्व दाखवले मात्र इतरत्र पिछेहाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागले. काँग्रेसचे अस्तित्वही या निवडणुकीत नगण्यच राहिले.

          डहाणू नगरपरिषदेत शिवसेना शिंदे पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या आघाडीचे उमेदवार राजू माच्छी यांनी राजपूत यांचा पराभव करून इतिहास घडवला. या निवडणुकीत काँग्रेस तसेच महत्त्वाचा पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार उभे केलेला नव्हता. त्यांचाही अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा राजू माच्छी यांना मिळालेला दिसतो. भाजपासाठी हा मोठा धक्का आहे. अर्थात भाजपने येथे सर्वाधिक १७ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ०८ व शिवसेना शिंदे पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत.

              पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक १९ जागा मिळवून नगरपरिषदेवर आपला झेंडा रोवला आहे .पालघर नगरपरिषदेत शिवसेने शिंदे पक्षाचे उत्तम मोरेश्वर घरत (१६५८०) यांनी भाजपचे कैलास सुकऱ्या म्हात्रे (११४२७) यांचा पराभव केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तम रमेश पिंपळे(४०९२) तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर काँग्रेसचे चिन्ह घेऊन लढलेले प्रीतम विश्वनाथ राऊत(३५४७) चौथ्या क्रमांकावर राहिले. येथे भारतीय जनता पक्षाचे ०८ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ०३ सदस्य निवडून आले.

          जव्हार नगरपरिषदेत भाजपाच्या पूजा कुणाल उदावंत (३८६५ ) यांनी महाविकास आघाडी प्रणित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मणियार रश्मीन रियाज (२२१२) यांचा पराभव केला . शिवसेना शिंदे सह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आघाडीच्या रजपूत पद्मा गणेश (१४७९) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या . येथे भाजपने १४, शिवसेना शिंदे ०२, राष्ट्रवादी अजित पवार ०३, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ०१ जागा मिळाली.

           वाडा नगरपंचायतीत भाजपच्या रिमा हर्षद गंधे (३९६७) यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या हेमांगी हिरामण पाटील (२९९५) यांचा पराभव केला. शिवसेना शिंदे पक्षासह जिजाऊ संघटनेसाठी हा मोठा धक्का आहे .उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निकिता निलेश गंधे (२४८७ ) या येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. येथे भाजपचे ११, शिवसेना शिंदे ०३, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ०१, तर काँग्रेस पक्षाचे ०१ व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ०१ सदस्य निवडून आले .

Leave Your Comments