चारोटी पुलाजवळ भीषण अपघात; ६०० किलो चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनची ट्रेलरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर

**चारोटी पुलाजवळ भीषण अपघात; ६०० किलो चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनची ट्रेलरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू**

            मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी पुलाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चांदीच्या प्लेटस वाहून नेणाऱ्या व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. सुमारे १७ कोटी रुपये किमतीची ६०० किलो चांदी घेऊन गुजरातकडे निघालेली ही व्हॅन भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत घुसली आणि समोरून येणाऱ्या ट्रेलरवर आदळली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनी येथून गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील मोडीसन लिमिटेड या कंपनीकडे चांदीचा माल घेऊन व्हॅन रवाना झाली होती. या वाहनात ६०० किलो वजनाच्या २० चांदीच्या प्लेट्स होत्या.

            चारोटी पुलाजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व्हॅन प्रथम गुजरातकडे जाणाऱ्या लेनमधील दुभाजकावर आदळली. त्यानंतर ती दुभाजक फोडून थेट मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये घुसली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रेलरशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली.

           धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. अपघातात व्हॅनचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

            घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनाग्रस्त वाहनातून सुमारे १७ कोटी रुपये किमतीच्या ६०० किलो चांदीच्या सर्व २० प्लेट्स सुरक्षित जप्त करण्यात आल्या असून त्या पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्या.
या अपघातामुळे काही काळ मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.

Leave Your Comments