नवयुग पालघर
पालघर येथील जिल्हा रुग्णालय व मनोर येथील ट्रॉमा रुग्णालयाचे उदघाटन ०१ मे रोजी होणार अशी घोषणा झाली आहे, ही घोषणा वास्तवात येण्यात असलेल्या अडथळ्यांचा धांडोळा घेणारे नवयुग पालघर १९ एप्रिल रोजीच्या अंकातील हे संपादकीय,
**निधीअभावी रखडलेली आरोग्यसेवा: उदघाटनाची घाई,अट्टाहास कशासाठी ?**
पालघर जिल्ह्यात अलीकडे पार पडलेल्या पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ताधारी शिंदे सेनेने नगरविकास विभागाकडील निधी मोठ्या प्रमाणावर वळविल्याचे सर्वज्ञात आहे . भाजपनेही काही प्रमाणात हे काम केले, निवडणुकांमध्ये इतर कारणांसाठी किती पैसा वापरण्यात आला, याचा हिशोब घेण्याची ही वेळ नाही. मात्र या निवडणुका जिंकण्यासाठी निधी उपलब्ध करून देणारे सत्ताधारी, पालघर जिल्ह्यातील मूलभूत आरोग्यसेवांसाठी गेली अनेक वर्षे आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत, ही मोठी शोकांतिका आणि संतापजनक बाब आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील याच पक्षाचे नेतृत्व, खासदार आणि आमदार यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आदींच्या भेटी घेतल्या, निवेदने दिली; मात्र त्यापुढे कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. अलीकडे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १ मे रोजी पालघर जिल्हा रुग्णालय आणि पालघर-मनोर येथील २०० खाटांचे ट्रॉमा रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. मात्र या दोन्ही आरोग्यसेवा सुरू करण्यामध्ये निधीचा अभाव हा मोठा अडथळा आहे, याची जाणीव संबंधित मंत्र्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते.
अलीकडे आढावा समितीचे अध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पालघर येथे आले असता, त्यांच्या भेटीदरम्यान आमदार राजेंद्र गावित यांनीही १ मे रोजी या दोन्ही आरोग्यसेवांचे उद्घाटन होणार असल्याचा पुनरुच्चार केला . मात्र त्यावेळीही या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. आवश्यक कामे पूर्ण झालेली नाहीत. पदभरती झालेली नाही. आवश्यक उपकरणेही उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत उद्घाटन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित झाला असता, युद्धपातळीवर कामे पूर्ण करून उद्घाटन होईल, असे सांगण्यात आले.
आता आमदार राजेंद्र गावित यांनीच या आठवड्यात बोलावलेल्या बैठकीत पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम १ मेपर्यंत पूर्ण होऊ शकणार नसल्याचे कंत्राटदारांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे, मनोर येथील ट्रॉमा सेंटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऐनवेळी रंगकाम पूर्ण झालेल्या इमारतीचा रंग बदलून नव्याने रंग देण्याचे कामही विभागावर आणि कंत्राटदारावर सोपविण्यात आले आहे. ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. मात्र समजा ही कामे पूर्ण झाली, तरी आवश्यक पदभरती झालेली नाही आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत उद्घाटनाची एवढी घाई आणि अट्टाहास कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो.
पदभरती आणि उपकरणांच्या कमतरतेवर तोडगा म्हणून आता आरोग्य विभाग राज्यातील अन्य ठिकाणांहून, विशेषत: ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून अधिकारी-कर्मचारी वर्ग तसेच आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचे ठरवत आहे. ही अशा प्रकारची उसनवारी कितपत योग्य आहे? २०० खाटांचे रुग्णालय सुरू झाल्यानंतर तेथे उपचारासाठी येणार्या रुग्णांवर, विशेषत: अपघातग्रस्त गंभीर रुग्णांवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत, तर त्याला जबाबदार कोण?
मनोर येथील ट्रॉमा रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्याचे ग्रामीण रुग्णालय बंद होणार आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण रुग्णालयातून मिळणार्या सेवा या नव्या रुग्णालयामुळे प्रभावित होणार नाहीत ना, याची खात्री शासनाने द्यावी.
या ट्रॉमा रुग्णालयासाठीही आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही. मार्च महिन्यात उपलब्ध झालेल्या निधीतून आधीची काही देयके भागविण्यात आली; मात्र हा निधी पुरेसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री पालघर येथे आले असताना त्यांनाही निधीच्या अडचणी सांगण्यात आल्या होत्या. त्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटूनही आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही.
जिल्ह्यासाठी अत्यावश्यक अशा आरोग्यसेवा जर अशा प्रकारे निधीअभावी रखडत असतील, तर त्याला येथील लोकप्रतिनिधी आणि सत्ताधार्यांना जबाबदार धरावे लागेल. मात्र हेच प्रतिनिधी या जबाबदारीतून स्वत:ला मोकळे करू पाहत आहेत, ही बाब संतापजनक आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि त्यात ते आजवर अपयशी ठरले आहेत, असेच म्हणावे लागेल.
गेली दोन-चार वर्षे निधीअभावी या दोन्ही रुग्णालयांची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रभावित होत असून नागरिकांना उपचारांसाठी इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांत जावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर बाहेरील रुग्णालयांतूनही “तुमच्या राज्यात तुम्हाला सेवा मिळत नाही का?” असा सवाल पालघरकरांना विचारला जात आहे. ही बाब आमच्या लोकप्रतिनिधींच्या कानावर गेली आहे; मात्र त्याचे कोणतेही गांभीर्य शासनाला किंवा प्रतिनिधींना नसावे, हे लाजिरवाणे आहे.
आता जर जिल्हा रुग्णालय आणि मनोर ट्रॉमा रुग्णालय सुरू करायचे असेल, तर शासनाने तात्काळ आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच आवश्यक पदभरती, उपकरणांची उपलब्धता आणि उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. केवळ उद्घाटनाचा सोहळा नव्हे, तर सक्षम आरोग्यसेवा नागरिकांना मिळणे महत्त्वाचे आहेच, किंबहुना तो हक्कच आहे