नवयुग पालघर
**पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र पाटील रुजू;
डॉ. रूपाली सातपुते यांची रायगडला बढतीवर नियुक्ती**
पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजेंद्र पाटील यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. तर प्रभारी कार्यभार सांभाळणाऱ्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांची पदोन्नती होऊन रायगड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले पाटील हे एमपीएससी २००२ बॅचचे अधिकारी आहेत.
राजेंद्र पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गटविकास अधिकारी म्हणून जळगाव तसेच मेहकर (जि. बुलढाणा) येथे केली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा आणि नंदुरबार जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. पुढे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (तपासणी) म्हणून जबाबदारी सांभाळली.
यानंतर त्यांनी प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद नंदुरबार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद नाशिक या पदांवर कार्य केले. सध्या ते राज्य निवडणूक आयोगात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीनंतर त्यांची पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिकदृष्ट्या राजेंद्र पाटील यांनी एम.ए., एम.एड. पदवी घेतली असून सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) इजाज अहमद शरीक मसलत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रवींद्र शिंदे सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार प्रकल्प संचालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते यांच्याकडे देण्यात आला होता. सातपुते यांची पदोन्नती होऊन त्या २१ एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत.