नवयुग पालघर
**ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आता विशेष पाऊल; पालघरमध्ये ‘अधाता वृद्ध आरोग्य (जेरियाट्रिक)
केअर सेंटर’चे उद्घाटन **
वाढते वय, अनेक आजारांचे ओझे, औषधोपचारांची धावपळ आणि बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे वाढलेली एकटेपणाची भावना… अशा अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पालघरमध्ये आता दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये ‘अधाता जेरियाट्रिक केअर सेंटर’ची स्थापना करण्यात आली असून वृद्धांसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे हे विशेष केंद्र आहे.
रविवारी, १९ एप्रिल २०२६ रोजी अधाता ट्रस्टचे अध्यक्ष अरुण नंदा आणि अमित गोयला यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमृतभाई शाह, लायन चेतन शाह, पूजा नंदा, नीरजा नंदा यांच्यासह विविध मान्यवर, वरिष्ठ डॉक्टर, विश्वस्त आणि वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य उपस्थित होते.
वाढत्या वयात शरीरासोबत मनाचीही काळजी घेणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णकेंद्रित आणि सर्वांगीण उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी यांसारख्या दीर्घकालीन आजारांसह विस्मरणाचा आजार (डिमेन्शिया), पार्किन्सन, पक्षाघातानंतरची
(स्ट्रोकनंतरची) काळजी आणि शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या केंद्रात वृद्ध आरोग्य (जेरियाट्रिक) तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ ( फिजिशियन), व्यायामोपचार तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट) , आहारतज्ज्ञ आणि समुपदेशक अशा विविध तज्ज्ञांची टीम कार्यरत राहणार आहे. वृद्धांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्यालाही उपचाराइतकेच महत्त्व देण्यात येणार आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत सौम्य होमिओपॅथिक उपचारांची जोड देण्याचाही प्रयत्न येथे करण्यात येणार आहे.
या प्रसंगी डॉ. अनुप निगवेकर आणि डॉ. आनंद कापसे यांनी केंद्राची गरज व उद्दिष्टे स्पष्ट केली. अरुण नंदा यांनी आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधाता ट्रस्टचा कायम पाठिंबा राहील, असे सांगितले. विश्वस्त डॉ. मनोज पटेल यांनी ज्येष्ठांसाठी होमिओपॅथिक उपचारांचे फायदे मांडले, तर डॉ. प्रशांत तांबोळी यांनी हे केंद्र केवळ उपचारासाठी नव्हे, तर ज्येष्ठांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
हॉस्पिटलमधील अति दक्षता विभाग(आयसीयू), आधुनिक शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर), रोगनिदान प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी), प्रतिमांकन विभाग (रेडिओलॉजी) आणि २४ तास आपत्कालीन सेवा यामुळे रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वृद्ध रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी सोय होणार आहे.
पालघर जिल्ह्यात वाढणारी ज्येष्ठांची संख्या आणि बदलती सामाजिक रचना पाहता अशा विशेष केंद्रांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती. याच पार्श्वभूमीवर लवकरच ज्येष्ठांसाठी दिवसभर देखभाल (डे-केअर) सुविधा सुरू करण्याचा केंद्राचा मानस आहे, ज्यामुळे परवडणारी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा मिळणार आहे.