ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक–उमेद समन्वयावर भर पालघर येथे जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक कार्यशाळा संपन्न

Date: 2026-01-21
news-banner
https://youtu.be/Gh2kjhdgDc0?si=kCK2M44Bfjgkvlu-

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक–उमेद समन्वयावर भर
पालघर येथे जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक कार्यशाळा संपन्न


ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण साध्य करत स्वयं सहाय्यता समूहांना शाश्वत आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) – ‘उमेद’ अंतर्गत बँक लिंकेज विषयावर एकदिवसीय जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक कार्यशाळेचे आयोजन सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद पालघर येथील बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले.
ही कार्यशाळा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बँका आणि उमेद यंत्रणेमधील समन्वय अधिक बळकट करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले की, ग्रामीण महिलांचे खरे सक्षमीकरण साध्य करण्यासाठी स्वयं सहाय्यता समूहांचे बँकांशी प्रभावी लिंकेज अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना केवळ कर्जपुरवठ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बँका आणि उमेद यंत्रणेमधील समन्वय अधिक दृढ झाल्यास *‘लखपती दीदी’*सारखे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेदरम्यान ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत महिलांच्या उद्योगांना बँकांकडून कर्जपुरवठा, स्वयं सहाय्यता समूहांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे, तसेच बँक पतपुरवठ्याची प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक कशी करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ (NRP) जी. बी. भूयान यांनी बँक व्यवस्थापकांना उद्योजकता कर्ज (Enterprise Financing), भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना तसेच महिला उद्योजकांसाठी उपलब्ध विशेष सवलती यांची माहिती दिली. यासोबतच One GP One BC, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, CBRM समिती, बँक पतपुरवठ्याची उद्दिष्टे साध्य करण्याच्या रणनीती आणि डिजिटल फायनान्स या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या दरम्यान आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या बँक शाखा व्यवस्थापकांचा विशेष गौरव करण्यात आला. बँक लिंकेज, पतपुरवठा व आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या शाखा व्यवस्थापकांना प्रमाणपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
MSRLM अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक समावेशन उपक्रमांमुळे स्वयं सहाय्यता समूहांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर, पारदर्शक व प्रभावी आर्थिक सेवा उपलब्ध होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. महिलांना जीवन संरक्षण व वृद्धापकाळासाठी विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समूहांना विविध बँकांमार्फत बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत असून, या कर्जाचा उपयोग महिलांनी लघुउद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण २४९८ स्वयं सहाय्यता समूहांना ९,८१७.२८* कोटी रुपयांचा बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला असून, ही बाब ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यशाळेस जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विशाल वाघ, जिल्हा अभियान व्यवस्थापक (MSRLM) रवी बोबडे, जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक, MSRLM चे अधिकारी, प्रभाग समन्वयक, मबँक सखी, FLCRP तसेच इतर प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व बँकांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन राहील शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन शेफाली गुप्ता व नरेश जाधव यांनी केले.

Leave Your Comments