https://youtu.be/KceP57822aQ?si=8pGvLKNg_skaCfNY
📰 दाभाडीतील दुःखद घटना : नदीत बुडून अलका भावरचा मृत्यू, आमदार विनोद निकोले यांचा तत्पर हस्तक्षेप
दाभाडी हटिचामाळ (ता. डहाणू) :
डहाणू तालुक्यातील दाभाडी हटिचामाळ येथे सोमवारी (दि. २१ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी घडलेल्या एका दुःखद घटनेत अरविंद आश्रमशाळा, दादडे येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी अलका कासम भावर (वय अंदाजे १० वर्षे) हिचा नदीत बुडून मृत्यू झाला.
सुट्टीच्या निमित्ताने, चळणी येथे आपल्या मोठ्या बहिणीकडे आलेली अलका सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास चळणी नजीक डुंबरीचा ओहोळच्याकाठी (पुढे जाऊन सूर्या नदीला मिळणारा) एका खडकावर बसली असता, तोल जाऊन नदीत पडली...पडल्याचे दिसताच, सोबतच्या मुलांनी तिला वाचवा म्हणून आरडाओरडा सुरू केला. नदीच्या दुसऱ्या काठावर असलेले रवींद्र गिंभल, यांनी हा आवाज ऐकताच, त्या बाजूने धाव घेऊन ग्रामस्थांसह लगेचच नदीत उतरून तिचा शोध सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. तात्काळ तिला बाहेर काढून पंपिंग व अन्य प्राथमिक उपचार करत आत शिरलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, सायवन येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत असल्याचे घोषित केले.
यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, शववाहिनी (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून देण्यास डॉक्टरांनी टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने, आमदार कॉ. विनोद निकोले यांनी स्वतः उपकेंद्रात धाव घेऊन हस्तक्षेप केला.
मुसळधार पावसात रात्री सुमारे ९ वाजता आमदार निकोले यांनी डॉक्टरांशी थेट चर्चा करून तात्काळ ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. तसेच डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या आवश्यक सूचना दिल्या.
आमदार निकोले यांनी अलका भावरच्या कुटुंबीयांना भेटून सहानुभूती व्यक्त केली तसेच शासकीय आर्थिक मदतीसाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेने दाभाडी परिसरात शोककळा पसरली आहे.