शासनाची तिजोरी रिकामी – कंत्राटी शिक्षकांची दिवाळी वेतनाविना अंधारात

Date: 2025-10-23
news-banner
💠 शासनाची तिजोरी रिकामी – कंत्राटी शिक्षकांची दिवाळी वेतनाविना अंधारात

 धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला निधी मंजूर, पण कोषागार सुट्टीमुळे वितरण रखडले; १२०० शिक्षकांची दिवाळी अंधारात


पालघर | प्रतिनिधी
दिवाळीचा सण उजाडला तरी पालघर जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांच्या घरात मात्र दिव्यांऐवजी आर्थिक अंधार पसरलेला आहे. यातून शासनाची तिजोरी रिकामी असल्याचे ढळढळीत सत्य पुढे आले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पगार थकलेले तब्बल १२०० शिक्षक आजही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीच्या दिवशी शासनाकडून काही निधी मंजूर झाला, मात्र कोषागाराची सुट्ट्यांची सबब आणि अन्य काही प्रशासकीय कारणांमुळे शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळाले नाही आणि ह्या शिक्षक कुटुंबाची दिवाळी कोरडी गेली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसतानाच शिक्षण क्षेत्रातही सरकारची तिजोरी कोरडीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. पगाराविना जगणारे कंत्राटी शिक्षक तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत — काहींना १६ हजार तर काहींना २० हजार रुपये पगार ठरवण्यात आला आहे. परंतु जूनपासून पगार मिळालेला नाही. शिक्षण देणारे हात आता कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेत अनेक शिक्षक पदे रिक्त असल्याने जिल्हा प्रशासनाने मानधन तत्त्वावर नियुक्ती दिली होती. मात्र शासनाकडून वेळेवर निधी आला नाही. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला शासनाकडून दोन कोटी एक लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु सुट्ट्यांच्या कारणास्तव तो पंचायत समित्यांमध्येच अडकून राहिला. त्यामुळे शिक्षकांच्या खात्यांत एक रुपयाही जमा झाला नाही.

दरमहा तुटपुंज्या पगारावर कुटुंब चालवणाऱ्या शिक्षकांच्या घरात दिवाळी साजरी करणे तर दूरच, पण दैनंदिन खर्च भागवण्याचेही संकट उभे राहिले आहे. “प्रकाशाच्या सणातही अंधार आमचाच वाट्याला” असे उद्गार अनेक शिक्षकांच्या तोंडी ऐकू येत आहेत.

“शासनाने नियुक्ती दिली, पण वेतनाचा स्थिर स्रोत नाही. निधी मिळाला तरी सुट्ट्यांचा बहाणा देऊन वितरण लांबवले जाते. हा अन्याय थांबवावा,” अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली तर त्यांना नोटीस देऊन कामावरून कमी करण्याची भीती.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवला असल्याचे सांगितले. “सुट्टीनंतर सर्व शिक्षकांना पगार दिला जाईल,” अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी दिली. मात्र शिक्षकांचा प्रश्न आहे — “सणानंतर पगार?”

Leave Your Comments