बहुजन विकास आघाडीच्या विजयाने भाजप-शिंदे सेना जमिनीवर !

Date: 2026-01-23
news-banner
अलीकडेच वसई मनपा निवडणूक पार पडली..लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बहुजन विकास आघाडीसाठी ही निवडणूक एक आव्हान होते. तर ही निवडणूक आपण सहज जिंकू अशी भाजपा व शिंदे सेनेची अटकळ होती.. मात्र या दोन्ही पक्षाना जमिनीवर आणत बविआने आपला गड राखला..

यावर भाष्य करणारे नवयुग पालघर १८ जानेवारीच्या अंकातील हे संपादकीय...

बहुजन विकास आघाडीच्या विजयाने भाजप-शिंदे सेना जमिनीवर !

 वसई महानगरपालिकेच्या निकालाने जमिनीवरून हवेत गेलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदेला चपराक बसून एकदम जमिनीवर उतरवण्याचं काम केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेतील निवडणुकीनंतर आता वसईचे आपणच राजे अशा अविर्भावात हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे आमदार वावरू लागले होते. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आणि त्या जोरावर आपण वसईतील सरकार आणू अशी स्वप्नं ही मंडळी पाहत होती. मधल्या काळात प्रशासक असल्याने वसईतील सत्ताही ही मंडळीच राबवत होती असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र सर्व पातळीवरची सत्ता आणि पैसा असूनही मतदार बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले. हे असे का घडले याचा मागोवा आता भाजप आणि शिंदे सेना दोघे घेतीलच. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे मतदार भाजप शिंदे सेनेच्या सोबत राहिले त्या मतदारांनी यावेळी बहुजन विकास आघाडीच्या पारड्यात मते टाकल्याचे दिसते. स्थानिक राजकारण म्हणून मतदारांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला असे यातून म्हणता येईल . 
 बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे वसई महानगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप - शिंदे सेना मैदानात उतरले होते. लोकसभा विधानसभेत मतदारांनी आपल्याला कौल दिला असल्याने महानगरपालिकेतील मतदार आपल्या बाजूने राहतील या अपेक्षेत हे दोन्ही पक्ष राहिले असावे. मात्र मतदार वेगळा विचार करत होते, असे निकालावरून म्हणता येईल.
  बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र लढले असते तर हे चित्र आणखी वेगळे राहिले असते. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांनी आपले चिन्ह घ्यावे या आग्रहामुळे ही आघाडी प्रत्यक्षात येऊ शकली नाही असे समजते. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या या आग्रहाबाबतचा तर्क मात्र समजू शकला नाही. असे असले तरी त्यांनी एक हाती आपले सत्ता अबाधीत राखली. हितेंद्र ठाकूर म्हणाले, त्याप्रमाणे वसईतील मतदार त्यांच्यासोबत राहिला. याही पुढे जाऊन म्हणायचं तर बविआ सोबत राहण्याचं या मतदारांनी पूर्वीच पक्क ठरवलं असावं, त्यामुळेच हे यश मिळालं आहे. 
 या निवडणुकीत बविआ विरोधात अनेक मुद्दे प्रचारात आले. या मुद्द्‌यांची दखल घेऊन पुढे काम करणार असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी आता म्हटले आहे. यात पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबून राहण्याच्या घटना याबरोबरीने अनधिकृत बांधकाम तसेच पिण्याचे पाणी आदी मुद्द्‌यांचा समावेश आहे. बहुजन विकास आघाडीला आता या मुद्द्‌यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषत: पावसाळ्यात वसई तुंबून राहण्याचा प्रकार. आता त्यांना वाढत्या नागरिकरणाबरोबरीने सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे करतानाच्या नियोजनावर आणि यातील मर्यादेवर लक्ष द्यावे लागेल. वाढत्या नागरिकरणाबरोबरीने येणारे प्रश्न विशेषत:, पाण्याच्या प्रश्नाकडेही आता बविआला लक्ष पुरवावे लागेल. पालघर व परिसरातील धरणांमधून पाणी आणण्याला असलेल्या मर्यादा विचारात घेऊन स्थानिक पातळीवर काही पर्यायांचा बविआला शोध घ्यावा लागेल. 
 यापूर्वी बविआकडे एक हाती सत्ता होती आणि राज्यातील सत्ताधार्‍यांचा वरदहस्त आपल्यावर राहील याची दक्षताही बविआने वेळोवेळी घेतली होती. यापुढे तसे चित्र राहिल असे म्हणता येत नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे प्रबळ विरोधक म्हणून बविआसमोर आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मधला हा समतोल देखील वसईकरांच्या हिताचा ठरेल आणि जनहितांचे प्रश्न आणि समस्यांकडे सत्ताधारी गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया !

Leave Your Comments