जग नवे, ओळख नवी’ संकल्पनेतून सृजन संस्थेचे व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न

Date: 2026-06-24
news-banner
**जग नवे, ओळख नवी’ संकल्पनेतून सृजन संस्थेचे व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न**

            सृजन संस्था, पालघर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालकांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावर्षी शिबिराची संकल्पना ‘जग नवे, ओळख नवी’ अशी होती. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे बंदिस्त सभागृहात शिबिर न घेता टेंभोडे येथील प्रफुल्ल पाटील यांच्या निसर्गरम्य चिकूवाडीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे शिबिरार्थींना मोकळ्या वातावरणात विविध उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळाली.
 शिबिरादरम्यान मुलांनी झाडावर चढणे,रोप क्लाइंबिंगंसारख्या साहसी उपक्रमांचा मनसोक्त अनुभव घेतला. शिबिरात तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
 पहिल्या ‘गप्पा व गोष्टी’ या सत्रात लो. ज. ना. विद्यालय, आगरवाडी येथील माजी उपमुख्याध्यापिका गीता पागी यांनी मुलांना विविध प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. यावेळी एकमेकांविषयी प्रेम, आदर आणि ममता जपण्याचा संदेश त्यांनी दिला.
 दुसर्‍या सत्रात विपला फाउंडेशन, विक्रमगड येथील भूपेंद्र कर्वे आणि नामदेव कुरकुटे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून कौशल्य विकासावर भर दिला. खेळातून समस्या सोडविणे, संवाद, कौशल्य, संघभावना आणि टीमवर्क यांसारख्या गुणांचा विकास कसा करता येतो, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
        तिसर्‍या सत्रात प्रज्ञा प्रबोधिनी, गोरेगाव येथील कलाशिक्षिका माधुरी सावंत यांनी मुलांना ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या उपक्रमात मुलांनी विविध पक्षी, प्राणी आणि आकर्षक कलाकृती तयार करून आपली सर्जनशीलता दाखवून दिली.
शिबिरादरम्यान प्रज्ञा गावड यांनी खेळाद्वारे मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. आयुष्यात पुढे जाताना आपल्याला अनेक सोबती, मित्र मैत्रीण, नातेवाईक भेटतील. आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे अन्यथा येणार्‍या आयुष्यात एकटेपणाचा सामना करावा लागेल असा मोलाचा संदेश त्यांनी खेळामार्फत दिला
       शिबिरात टेंभोडे, पालघर, सफाळे, विरार, बोईसर, कल्याण, मुंबई, केळवे, वडराई आणि उमरोळी परिसरातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील ८६ शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला.
          शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अथर्व पाटील, प्रत्युषा पाटील, स्मिता पाटील-आरेकर, मधुरा पामाळे, स्मिता पाटील, प्रज्ञा गावड, प्रफुल्ल पाटील, नारायण रसनकुटे, मैथिली गावडे, प्रिया गायकवाड, अलका पाटील, सुजाता पाटील, कृष्णा पाटील, प्रिया पाटील, प्रमोद पाटील,अरुण जाधव,छबिलदास गायकवाड, कृष्णा नाईक, रमाकांत पाटील आणि अंकिता पाटील, पारितोषिणी कुकडे,शुभांगी गावडे यांचे सहकार्य लाभले.
         शिबिराच्या समारोपप्रसंगी सर्व शिबिरार्थींना संस्थेचे अध्यक्ष तुकाराम किणी, प्रकाश लवेकर, सुभाष मोरे व अन्य उपस्थितांच्या हस्ते त्यांच्या सहभागाबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात अनुभव, शिक्षण, खेळ आणि सर्जनशीलतेचा संगम घडवून आणणारे हे शिबिर मुलांसाठी संस्मरणीय ठरले.

Leave Your Comments