नवयुग पालघर
**पालघरमध्ये १८.२३ लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त; दापचरी तपासणी पथकाची मोठी कारवाई**
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण-दीव येथून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ₹१८.२३ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई दापचरी सीमा तपासणी नाका, ता. डहाणू येथील पथकाने १९ जून रोजी केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धुंदलवाडी येथील ओव्हरब्रिजजवळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत सापळा रचण्यात आला. यावेळी महेंद्रा पिकअप (MH 04 GR 8049) या वाहनाची तपासणी केली असता, भूश्याच्या गोणपाटांच्या आड लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील अवैध मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत १०३७.५२ बल्क लिटर आयएमएफएल (विदेशी मद्य) जप्त करण्यात आले. हे मद्य दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथे विक्रीसाठी राखीव असून महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संजू श्रीराम बिंद (वय २८), रा. सुधरपूर, आजमगड (उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मालामध्ये विदेशी मद्यसाठ्यासह महेंद्रा पिकअप वाहनाचाही समावेश असून एकूण किंमत ₹१८,२३,३८० इतकी असल्याचे विभागाने सांगितले.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक गणेश बारगजे यांच्या आदेशानुसार पार पडली.
कारवाईत निरीक्षक एस. एस. फडतरे, उपनिरीक्षक पी. सी. पाटील, आर. जी. सूर्यवंशी तसेच जवान योगेश अंभोरे, करण दडस, गणेश शितोळे, विठ्ठल शिंदे आणि महेंद्र पार यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास आर. जी. सूर्यवंशी करीत आहेत.