https://youtu.be/ywklCanCnbA?si=p-ZSgdKVCuFgQAxE
जलसंधारण, घरकुल, स्वच्छता, कर वसुली ते ग्रामसचिवालय उभारणीपर्यंत सर्वांगीण विकासाचा ध्यास....
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोळगाव ग्रामपंचायतीची उल्लेखनीय कामगिरी
पालघर | प्रतिनिधी
दिनांक : २३ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जलसंधारणासाठी वनराई बंधारे, मनरेगामधील नाले सरळीकरण, प्रलंबित घरकुलांची पूर्तता, कर वसुली, स्वच्छता व्यवस्था, ग्रामसचिवालयाचे नियोजन तसेच सीसीटीव्ही बसविणे अशा विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करत कोळगाव ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाकडे ठोस पावले उचलली आहेत.
या अभियानातील सर्व निकष पूर्ण करून ग्रामपंचायतीला परिस्तोषिक प्राप्त व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ समन्वयाने कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सरपंच कुणाल चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच किरण संखे, ग्रामसेवक जितेंद्र पवार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विकासकामांना प्राधान्य दिले आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली असून, मनरेगा योजनेंतर्गत नाले सरळीकरणाची कामे सुरू आहेत. यासोबतच प्रलंबित घरकुलांची पूर्तता व नवीन घरकुल प्रस्तावांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक सक्षमतेसाठी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची नियमित व परिणामकारक वसुली करण्यात येत आहे. तसेच स्वच्छता, मूलभूत सुविधा, नोंदवही अद्ययावत ठेवणे व शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसचिवालयाच्या उभारणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासह शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, गाव तलाव तसेच स्वच्छतेशी संबंधित विविध विकासकामे सुरू आहेत.
लोकवर्गणी व सीएसआर निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे गावातील नागरी सुविधा अधिक सक्षम होत आहेत.
ग्रामपंचायतीच्या उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सर्व ग्रामस्थ उत्साहाने या अभियानात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्दिष्टांनुसार कोळगाव ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते...