आरोहन संस्थेच्या दशकपूर्तीचा उत्सव; आदिवासी विकासातील दहा वर्षांचा प्रवास साजरा होणार

Date: 2025-10-25
news-banner
https://www.youtube.com/watch?v=xAcJ_MFAW-c&t=829s

आरोहन संस्थेच्या दशकपूर्तीचा उत्सव; आदिवासी विकासातील दहा वर्षांचा प्रवास साजरा होणार

पालघर : जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरण व शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या ‘आरोहन’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याचा दशकपूर्ती उत्सव २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जव्हार येथे साजरा होणार असून या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर प्रमुख पाहुण्या असतील, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे अध्यक्षस्थान भूषवतील. साईमहल (राठोर ड्रायव्हिंग स्कूलच्या मागे) येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम, प्रदर्शनं आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता मॅरेथॉन स्पर्धेने होणार असून, ९.३० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, तसेच ‘आरोहन’च्या कामाचा प्रवास, स्थानिक विकासाचा आढावा, आव्हाने आणि पुढील दिशा या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

 आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, संस्थापक अंजली कानिटकर आणि विश्वस्त मंडळ अध्यक्षा डॉ. हेलन जोसेफ आदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.

गेल्या दहा वर्षांपासून ‘आरोहन’ संस्था पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, डहाणू आणि पालघर या आदिवासीबहुल तालुक्यांत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेने आरोग्य, शिक्षण, उपजीविका व शेती विकास, जलसंवर्धन आणि लोककेंद्री शासनव्यवहार या पाच प्रमुख क्षेत्रांत नियोजनबद्ध आणि हक्काधारित दृष्टिकोनातून उल्लेखनीय काम केलं आहे.

आरोग्य आणि पोषणविषयक मोहिमा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन यंत्रणा, रबी हंगामातील भाजीपाला लागवड, फुलशेती, तसेच जलसंधारण आणि शेती विकासाच्या माध्यमातून ‘आरोहन’ संस्थेने आदिवासी समाजात शाश्वत विकासाची पायाभरणी केली आहे.

निबंध स्पर्धा आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ‘आरोहन’च्या जव्हार कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी या दशकपूर्ती सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave Your Comments