सुशासन सप्ताहातून प्रशासनाचा आत्मपरीक्षणाचा आरसा
फाईल नव्हे, नागरिक केंद्रस्थानी असावेत
– जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
पालघर, दि. २३ डिसेंबर :
प्रशासनाची कार्यक्षमता ही कागदांच्या गतीवर नव्हे, तर नागरिकांच्या कामांना लागणाऱ्या वेळेवर ठरते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत कामे जलद, पारदर्शक व वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.
सुशासन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड होत्या.
कार्यशाळेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या की, सुशासन म्हणजे केवळ नियमांचे पालन नव्हे, तर प्रशासनाने स्वतःकडे आरशात पाहण्याची प्रक्रिया आहे. आपण नागरिकांना देत असलेल्या सेवा किती वेळेत पोहोचतात, त्यामध्ये अनावश्यक विलंब कुठे होतो आणि तो कसा टाळता येईल, यावर वर्षातून किमान एकदा तरी सखोल मंथन होणे आवश्यक आहे. सुशासन सप्ताह हा त्यासाठीच असलेला एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत विविध विभागांकडून सादरीकरणे करण्यात आली. या सादरीकरणांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहत त्यातील आशय समजून घेण्याचा प्रयत्न केला, ही बाब अत्यंत सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णयाची माहिती दिली. शासनाने पालघर जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकस्तर वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला असून, हा विषय अलीकडेच मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे प्रशासनात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनातील दैनंदिन कामकाजावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरणारी फाईल आणि त्यामुळे होणारा विलंब हा त्रासदायक अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. हाच अनुभव सामान्य नागरिकांनाही येतो. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विहित कालावधीत निकाली काढणे किंवा पुढील टप्प्यावर नेणे ही केवळ जबाबदारी नसून प्रशासनाचे कर्तव्य आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.
कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. जे. गोरे, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, तेजस चव्हाण, डिआरडीओच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख नरेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थित सर्वांचे अभिनंदन करत सांगितले की, सुशासन सप्ताहातून घेतलेले हे संकल्प प्रत्यक्ष कामात उतरले, तर पालघर जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, संवेदनशील व लोकाभिमुख बनेल.
येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी सकारात्मक, प्रगतीशील ठरो. सुशासनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे नाव राज्यात व देशात उज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.