तारपाच्या नादातून आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय सन्मान
ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
https://youtu.be/ksHCTeWS0jM?si=1EOX2iTbB92yT5SP
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील ज्येष्ठ आदिवासी लोककलावंत आणि सुप्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आदिवासी लोककला, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी आयुष्य वेचलेल्या धिंडा यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण ठरत आहे.
भिकल्या धिंडा यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपावादनाला सुरुवात केली. आज नव्वदी ओलांडलेल्या धिंडा यांची ही कला सुमारे चारशे वर्षांची वंशपरंपरा जपत पुढे नेणारी आहे. देवपूजा, सण-उत्सव, सामाजिक कार्यक्रम आणि आदिवासी जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेले तारपा वाद्य त्यांनी केवळ वाजवले नाही, तर त्याचे जतन व संवर्धन आपल्या जीवनाचे ध्येय बनवले.
उत्कृष्ट तारपावादक म्हणून राज्यभर ओळख असलेल्या धिंडा यांचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास दहा फूट लांबीचा तारपा वाजवण्याची हातोटी. ते स्वतः तारपाची निर्मिती करून आपल्या कलेच्या जोरावर चरितार्थ चालवतात. आजवर त्यांनी राज्यासह देशातील विविध ठिकाणी आपल्या वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले असून, अनेक युवकांना तारपावादनाचे धडे देत ही लोककला पुढील पिढीकडे सोपवली आहे.
यापूर्वीही त्यांच्या कार्याची दखल घेत संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार, ‘अजादी का अमृत महोत्सव’ सन्मानासह विविध केंद्र व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये त्यांची जिल्हा परिषद पालघरचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही निवड करण्यात आली होती.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी त्यांचे अभिनंदन करत, “आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा जपणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान हा संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
“तारपाच्या नादातून मी देवांची आराधना केली, हीच माझी साधना आहे,” असे भावूक शब्द व्यक्त करत धिंडा यांनी आपल्या जीवनप्रवासाची भावना मांडली. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे तारपा वाद्याला आणि आदिवासी लोककलेला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली असून, पालघर जिल्ह्यातून तसेच आदिवासी समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.