मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; संभाव्य आपत्तींवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

Date: 2026-04-26
news-banner
**मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; संभाव्य आपत्तींवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज**

             संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी व्यापक आणि समन्वयात्मक तयारी पूर्ण केली असून पूर, दरड कोसळणे, सखल भागांतील पाणी साचणे आणि किनारपट्टीवरील धोक्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला . यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार करता पूरप्रवण गावे, दरडप्रवण क्षेत्रे, सखल भाग आणि समुद्रकिनारी वसलेल्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित राहणार आहे.
 या भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. बैठकीत पाण्याखाली जाणारे पूल, पर्यायी मार्ग आणि जोखमीच्या ठिकाणांची माहिती सादर करण्यात येऊन त्यासंबंधी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बचाव आणि मदत कार्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रशिक्षित ‘आपत्ती मित्र/सखी’, बोट चालक, निवारा केंद्रे तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकांची सज्जता तपासण्यात आली. सर्व विभागांना 24x7 आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले असून नालेसफाई, धोकादायक होर्डिंग्ज हटविणे, जीर्ण इमारतींची तपासणी आणि पूर नियंत्रण आराखड्यांचे अद्ययावतीकरण या कामांवर विशेष लक्ष दिले जात आहे. सखल भागातील नागरिकांच्या संभाव्य स्थलांतरासाठीही नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाला आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यासह आपत्कालीन वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम, वीज व दूरसंचार विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. नदी व धरणांतील पाण्याची पातळी सतत निरीक्षणात ठेवून पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात आला आहे.
किनारपट्टी भागासाठी विशेष खबरदारी घेत मच्छीमारांना हवामानाच्या अचूक सूचना देणे, आवश्यकतेनुसार समुद्रात जाण्यास बंदी घालणे तसेच शोध व बचाव कार्यासाठी तटरक्षक दल सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

Leave Your Comments