टाटा स्टीलतर्फे शिष्यवृत्ती वितरण; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा गौरव

Date: 2026-04-27
news-banner
टाटा स्टीलतर्फे शिष्यवृत्ती वितरण; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा गौरव
पालघर, दि. २३ एप्रिल २०२६ : टाटा स्टील लिमिटेड (तारापूर शाखा) या आंतरराष्ट्रीय औद्योगिक आस्थापनातर्फे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याअंतर्गत दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या परीक्षेद्वारे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘टाटा वायरन फेलोशिप’ तर अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांसाठी ‘टाटा ज्योती फेलोशिप’ दिली जाते. टाटा वायरन फेलोशिप अंतर्गत वार्षिक रु. ८५००/- तर टाटा ज्योती फेलोशिप अंतर्गत वार्षिक रु. २५,०००/- इतके अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना दिले जाते. यावर्षी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २ विद्यार्थ्यांना टाटा वायरन फेलोशिप तर १० विद्यार्थ्यांना टाटा ज्योती फेलोशिप मिळाली.
टाटा वायरन फेलोशिप प्राप्त विद्यार्थी : नितीन शंकर घाटाळ, तनुजा परशुराम घरत.
टाटा ज्योती फेलोशिप प्राप्त विद्यार्थी : संगीता सुरेंद्र यादव, सारा संतोष मोरे, अनिष्का अल्पेश बारी, राज प्रकाश जोशी, आदित्य विनोद किणी, परी सचिन जैन, सृष्टी रामानंद यादव, तनिष्का प्रमोद पाटील, साक्षी प्रवीण पाटील, सिमी संजय मेर.
शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम टाटा स्टील तारापूरचे सीएसआर समन्वयक कुणाल बारी, त्यांचे सहकारी लोहीत बांगेरा, सुमित सोनावणे व राजेश वर्तक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे आणि उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी टाटा समूहाच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सीएसआर या संकल्पनेपूर्वीच जे.आर.डी. टाटा यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक सहाय्याची परंपरा सुरू केली होती आणि त्याचा लाभ देशातील अनेक घटकांना झाला आहे. उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योग्य उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विविध अभ्यासक्रम पूर्ण करत भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असा सल्ला दिला.
सीएसआर समन्वयक कुणाल बारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी टाटा समूहातर्फे सातत्याने मदत केली जात असल्याचे सांगत पालघर परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
टाटा स्टील शिष्यवृत्ती परीक्षा व संबंधित कागदपत्रांची जबाबदारी संतोष गायकवाड आणि कार्यालयीन वरिष्ठ लिपिक नंदिनी ठाकूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave Your Comments