सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मितांशू किणी व अर्पिता पाटील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी

Date: 2026-04-30
news-banner
**सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव;
 मितांशू किणी व अर्पिता पाटील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी**

               शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करताना त्यांच्या यशामागील मेहनत, सातत्य आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश मान्यवरांनी दिला.
'आवडीच्या क्षेत्रात सातत्याने मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठता येते. यश संपादन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी विसरु नये. तुम्ही ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाशी नाळ जोडून ठेवा,' असे प्रतिपादन पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
सोनोपंत दांडेकर वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गात विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे यांनी यावेळी बोलताना, 'महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या अडचणी महाविद्यालयाकडून सोडवल्या गेल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे,' असे सांगितले .
           महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत 'अपयशाने खचून न जाता नव्या जिद्दीने प्रयत्न करा. सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक मेहनतीमुळे यश निश्चित मिळते,' असा मूलमंत्र दिला.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी तसेच प्रकाश संखे, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
             या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, धनादेश व ग्रंथभेट देण्यात आली. शैक्षणिक प्रगती व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे मितांशू किणी याची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून, तर अर्पिता पाटील हिची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली. त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
               पारितोषिक वितरण समितीच्या प्रमुख डॉ. दर्शना चौधरी यांनी जबाबदारी सांभाळत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. समारंभ यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, प्रा. विवेक कुडू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संतोष चुरी, डॉ. दक्षता पाटील, संगीता मोरे, प्रा. कृतिका चुरी, मधुरा राऊत, सिंथिया शिंदे, सायली डहाणूकर, निनाद पाटील आदी प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले.

Leave Your Comments