दांडेकर महाविद्यालयात ‘लीलावती संघवी’ संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न “उद्योजकांनी शिक्षण संस्थांना सढळ हस्ते मदत करावी” – मनोज रानडे

Date: 2026-04-30
news-banner
**दांडेकर महाविद्यालयात ‘लीलावती संघवी’ संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न
“उद्योजकांनी शिक्षण संस्थांना सढळ हस्ते मदत करावी” – मनोज रानडे**

            “भविष्यातील प्रशिक्षित आणि उत्कृष्ट मनुष्यबळ घडवण्यासाठी उद्योजकांनी शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करताना अधिक उदार दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सीएसआर निधीचा वापर शैक्षणिक सोयी-सुविधा उभारण्यासाठी करणे ही काळाची गरज आहे.” असे उदगार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी काढले. सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालयात प्रीमियर इंटरमीडिएट लिमिटेडच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘श्रीमती लीलावती पुरुषोत्तम संघवी’ स्मृती संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी प्रीमियर इंटरमीडिएट लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीचे यावेळी विशेष कौतुक केले.

             माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र विभागासाठी सुसज्ज करण्यात आलेली ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रीमियर इंटरमीडिएट लिमिटेडचे संचालक मनीष पुरुषोत्तम संघवी व आशिष शशिकांत संघवी यांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले.

           शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या भविष्यातील शैक्षणिक उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनेश वर्तक, सचिव सुधीर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. किरण सावे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, विश्वस्त जगन्नाथ राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश संखे, तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख 
डॉ. जुईता राऊत व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. भक्ति पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विभूती साने यांनी केले.

Leave Your Comments