**पालघरमध्ये रोटरीतर्फे चौथे डायलिसिस सेंटर सुरू**
परिसरातील किडनी रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा उपक्रम म्हणून रोटरी क्लबच्या वतीने पालघर येथील आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चौथ्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन उत्साहात पार पडले. रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अग्रवाला यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
नव्या सेंटरमध्ये चार अत्याधुनिक डायलिसिस मशीनसह आरओ प्लांटची सुविधा उभारण्यात आली असून, यामुळे गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळणार आहेत. ग्रामीण व उपनगर भागातील रुग्णांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या माध्यमातून पालघर, मनोर आणि बोईसर परिसरात आतापर्यंत २० डायलिसिस मशीन देण्यात आल्या आहेत, तर पालघर व मुंबई परिसरात मिळून १०५ मशीनचे दान करण्यात आले आहे. क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त २०२९ पर्यंत २०० डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे संदीप अग्रवाला यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ पालघरच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ढवळे हॉस्पिटल येथे पहिले डायलिसिस सेंटर (११ मशीन) सुरू करण्यात आले होते, तर कोविड काळात २०२० मध्ये आस्था हॉस्पिटल, मनोरे येथे दुसरे सेंटर (५ मशीन) सुरू करण्यात आले होते, अशी माहिती रोटरी जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या डायलिसिस कमिटीच्या चेअरमन स्वाती जजोडिया,डीएच एसके कनोऱिया फाउंडेशनच्या रुचिरा देसाई, रोटरी पदाधिकारी संजय महाजन, मनीष पिंपळे, डॉ. भावेश पाटील, प्रशांत पाटील तसेच आरोग्यम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. कुणाल दोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.