पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी, जखमींना दिला आधार

Date: 2026-04-26
news-banner
पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी, जखमींना दिला आधार
पालघर : वाडा तालुक्यातील कोनसाई गावात मंगळवारी (दि. २१ एप्रिल) अनधिकृत फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी घटनास्थळाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी स्फोटग्रस्त भागाचा आढावा घेत संबंधित अधिकारी—पोलीस, महसूल व कामगार विभाग—यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी वाडा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर देत मदतही केली. या प्रकरणातील पीडितांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने अधिकृत कारखान्यांची यादी जाहीर करावी आणि तिची पडताळणी पोलीस पाटील व ग्रामसेवकांनी नियमितपणे करावी. ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास ही जबाबदारी पोलीस पाटलांनी, तसेच तेही नसल्यास संबंधित पोलीस निरीक्षकांनी पार पाडावी.
दहा पेक्षा अधिक कामगार असलेल्या ठिकाणी कामगार कायदे काटेकोरपणे लागू करणे आवश्यक असून महसूल, ग्रामविकास, कामगार आणि औद्योगिक सुरक्षा विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक कारखान्यात सुरक्षा उपाययोजना अनिवार्य करून ‘फायर रक्षक’ नेमण्याची सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कामगारांच्या शोषणाच्या तक्रारी ग्रामविकास विभागाने नोंदवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या प्रकरणी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मृत कामगार भावेश वावरे यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
आ. शांताराम मोरे यांचा संताप; पोलीस निरीक्षकांना सुनावले
घटनास्थळ पाहणीदरम्यान वाड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी “अशा प्रकारचा कारखाना सुरू असल्याची माहिती नव्हती” असे सांगितल्यावर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे संतप्त झाले. “आपल्या हद्दीत चालणाऱ्या या कारखान्याची कल्पना कशी नाही? या दुर्घटनेची जबाबदारी तुमचीच आहे,” अशा शब्दांत त्यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीतच पोलीस निरीक्षकांना सुनावले.
या पाहणीवेळी आमदार शांताराम मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, प्रांताधिकारी डॉ. संदीप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गट विकास अधिकारी सुनील गवारी, कामगार विभागाचे अजित मोहिते यांच्यासह विविध पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave Your Comments