नंडोरे–देवखोप येथे पंचायत राज बंधाऱ्याची उभारणी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जलसंधारणाला चालना
पालघर, दि. — : ग्रामीण भागातील जलसंधारण व शेती विकासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे–देवखोप येथे पंचायत राज बंधाऱ्याचे बांधकाम जिल्हा परिषद पालघरच्या ग्रामपंचायत विभागामार्फत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढून शेती, पशुपालन तसेच स्थानिक उपजीविकेला मोठा आधार मिळणार आहे.
या बंधारा उभारणी प्रसंगी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सोनल घोडके, उपसरपंच भरत घोडके, ग्रामपंचायत सदस्य जयेश पडवळे, रोहन वेडगा, विलास लहांगे, सुचिता पाटील, जिल्हा परिषद पालघरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) अशोक पाटील, पंचायत समिती पालघरचे गट विकास अधिकारी संजय भोये, अतिरिक्त गट विकास अधिकारी नाळे, विस्तार अधिकारी रमाकांत शिंदे, राजू कोळी, पेसा समन्वयक राहुल ठाकूर , ग्रामपंचायत अधिकारी निलेश देवरे यांच्यासह पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पेसा अध्यक्ष अशोक जाधव, कृषी सहाय्यक बाबर, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांनीही सहभाग नोंदविला.
लोकसहभागातून साकारलेल्या या पंचायत राज बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामे प्रभावीपणे राबविली जात असून नंडोरे–देवखोप ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.