नवयुग पालघर २१ डिसेंबर...निवडणूक खास..
जिल्ह्यात भाजपची शिंदे सेनेवर मात तर महाविकास आघाडी सपशेल अयशस्वी
जिल्ह्यातील चारही निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका महाविकास आघाडी अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बसला. महाविकास आघाडी जव्हार वगळता इतरत्र कुठेही आकारास येऊ शकली नाही. जिल्ह्यातील मविआ नेतृत्वाचे हे मोठे अपयश मानावे लागेल. समोर संघटित व आर्थिक दृष्ट्या प्रचंड प्रबळ शक्तीशी लढाई असताना देखील आव्हानाचे भान महाविकास आघाडीतील नेत्यांना नव्हते, असेच म्हणावे लागेल.
पालघरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष चांगली कामगिरी करेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी कैलास म्हात्रे यांनी पक्षांतर केल्याने आणि त्याला केतन पाटील,परेश पाटीलसह अनेकांनी साथ दिल्याने पक्ष अडचणीत आल्याचे निकालावरून निश्चितपणे सांगता येईल.पुन्हा पक्षांतर केल्याने पक्षांतर केलेल्यांचाही काही फायदा झाला असे चित्र दिसत नाही. ऐनवेळी प्रमुख कार्यकर्त्याने केलेल्या पक्षांतराचा फटका पक्षाला बसला. याच बरोबरीने याच पक्षातील काहींनी शिवसेना शिंदे पक्षाला आतून मदत केली असावी अशीही चर्चा आहे.निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व कोणी करावे हा मुद्दा नीटपणे हाताळायला हवा होता मात्र तसे घडले नाही.याचे निमित्त करुन पुढे दगाफटका झाला.
शिवसेना ठाकरे पक्षाला नगरपरिषद क्षेत्रात चांगला जनाधार असतानाही संघटनात्मक पातळीवर हा पक्ष कमजोर होत असल्याचे लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपरिषद निवडणुकीने देखील समोर आणले आहे. भाजपा शिवसेना आर्थिक बळावर निवडणूका जिंकतात हे वास्तव आहे. मात्र या शक्तीला सामोरे जाताना काही निश्चित बांधणी आवश्यक असते,ती उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून होताना दिसत नाही. पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीने पुन्हा एकदा पालघर हा शिवसेनेचा गड असल्याचे
दाखवून दिले आहे. शिंदे पक्षांने त्याचा पुरेपूर लाभ उठवला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने डहाणूत खूपच चांगली कामगिरी केली हे निश्चि . दिवंगत राजेश पारिख यांनी नगर परिषदेमध्ये या पक्षाला एक स्थान मिळवून दिले, ते स्थान काही अंशी तरी वरूण पारिख, मिहीर शहा आणि टीमला टिकवता आले हे अभिनंदनीय म्हणता येईल. डहाणूत शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले असले तरी या निवडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा मोठा वाटा आहे, हे इथल्या यशाचे विश्लेषण करताना विसरून चालणार नाही.
त्या तुलनेत जव्हार, वाडा मध्ये राष्ट्रवादी शरद पवार हा पक्ष नगण्य ठरत चालला आहे हे नेतृत्वाला लक्षात घ्यावे लागेल. पालघर मध्ये या पक्षाची तीच स्थिती राहिली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदेच्या दिमतीला खासदार आणि आमदार होते हे देखील त्यांच्या यशाचे एक कारण सांगता येईल. मात्र दुसर्या बाजूने महाविकास आघाडी या दोन्ही सत्ताधारी पक्षाविरोधात काही भूमिका घेऊन उभे राहत असल्याचे दिसत नाही. वाडा नगरपंचायतीत उद्धव ठाकरे शिवसेना कडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र तिथे पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला केवळ वाडामध्येच अस्तित्व दाखवता आले. इतरत्र काँग्रेसची कामगिरी नगण्य ठरली. पालघर मध्ये हा पक्ष अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे दिसत आहे.
भाजपाला जव्हार आणि वाडा तालुक्यात नगराध्यक्ष पदासाठी आर्थिक भार सांभाळणारे चांगले उमेदवार लाभले. पक्षाचेही आर्थिक बळ त्यांच्या पाठीशी राहिल्याने ही लढाई त्यांना अधिक सोपी झाली. शिवसेना शिंदे पक्षाने पालघर, डहाणू प्रमाणेच वाडा आणि जव्हार मध्ये देखील आपली सर्व ताकद आर्थिक बळासह पणाला लावली होती. मात्र पालघर वगळता या पक्षाला कुठेही आपली कामगिरी बजावता आली नाही. या अर्थाने शिवसेना शिंदे पक्षाचे हे अपयशच मानता येईल. किंबहुना भाजपाने शिवसेना शिंदे पक्षावर जिल्ह्यात मात केली असाच या निकालाचा अर्थ सांगता येईल. विरोधी पक्ष डहाणूत त्यांच्या साथीला नसते तर येथे या पक्षाला संधी मिळाली नसती असेच आजचे चित्र सांगते.