नवयुग पालघर २१ डिसेंबर : अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
पालघर,डहाणू, जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे नवयुग पालघरतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कारकीर्दीसाठी सदिच्छा !
पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले उत्तम घरत यांना प्रशासनाचा दीर्घ असा अनुभव आहे. नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून आजतागायत ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत व या काळात उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत असताना पदसिद्ध पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मोजकेच बोलणे आणि गाजावाजा न करता काम करणे हा त्यांचा पिंड राहिलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,
नवली सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते आदि पदांवर काम केलेले मोरेश्वर घरत यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. मात्र ते शिवसेना पक्षाशी जोडले गेले. शिवसेना पक्षात दुफळी झाल्यानंतर ते बराच काळ उद्धव ठाकरे पक्षासोबतच राहिले. मात्र अलीकडे त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आणि नगराध्यक्ष उमेदवार म्हणून ते पुढे आले. पक्षाने त्यांना या पदासाठी संधी दिली व ते चांगल्या मतांनी निवडून आले. उत्तम घरत यांचे अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी सदिच्छा !
डहाणू नगराध्यक्ष राजू माच्छी
डहाणू नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदावर निवडून येऊन इतिहास घडवणारे राजू माच्छी यांनी यापूर्वी उपनगराध्यक्षपद भूषवले असून चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते मूळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे. मात्र अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आणि नगराध्यक्ष पदावर दावा करत ही निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वी झाले. त्यांना नगरपरिषद प्रशासनाचा दीर्घ काळाचा अनुभव आहे.
भरत राजपूत यांच्याविरुद्धच्या लढाईत त्यांना समाजाच्या सर्व घटकाकडून पाठिंबा मिळालेला दिसतो त्यांचे अभिनंदन आणि पुढील कारकीर्दीसाठी सदिच्छा !
जव्हार नगरपरिषद नगराध्यक्ष पूजा कुणाला उदावंत
जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या पूजा कुणाला उदावंत या पहिल्यांदाच तेही थेट नगराध्यक्ष म्हणून नगरपरिषदेत पाऊल टाकत आहेत. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले कुणाल उदावंत हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र हे पद राखीव झाल्याने त्यांच्या पत्नीला ही संधी मिळाली.
घरातील राजकीय पाश्र्वभूमी व वातावरणाचा फायदा नवीन नगराध्यक्षांना होईल. त्यांचे पतीही नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्यांची साथ साहजिकच अपेक्षित आहे. कुणाल उदावंत यांनी जव्हार नगरपरिषदेसाठी आधीपासून तयारी सुरू केली होती. त्यांनी स्वत:च आपले टीम उभी करून रिंगणात उतरवली. स्वत:चे आर्थिक बळ आणि पक्षाकडून मिळालेली रसद त्यांना अर्थातच उपयोगी ठरली आणि त्यांनी जव्हार मध्ये एक हाती बाजी मारत आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदावर विराजमान केले. पूजा उदावंत यांचे अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी सदिच्छा !
वाडा नगरपंचायत नगराध्यक्ष रीमा हर्षद गंधे
वाडा नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या रीमा हर्षद गंधे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. साहजिकच त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे.
वाडा शहरात महिला गटाच्या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरण उपक्रमासह विविध उपक्रम राबवत असतात तसेच सामाजिक कार्यातही त्या सक्रिय असतात.या पाश्र्वभूमीचा फायदा त्यांना मिळणार आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील कारकीर्दीसाठी सदिच्छा !